नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलगा फराझची होणार चौकशी

नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ; मुलगा फराझची होणार चौकशी

महाराष्ट्राच्या सरकारमधील नेत्यांवर सध्या ईडीचे धाडसत्र सुरु आहे. गेल्या बुधवारी राज्याचे मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यानंतर आता नवाब मलिक यांच्या मुलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक यांना ईडीने आता समन्स पाठवला आहे. नवाब मलिक यांच्यावर कारवाई सुरु असतानाच त्यांचा मुलगा फराझ मलिक यांना देखील ईडीचे समन्स पाठवण्यात आले आहेत. त्यानंतर फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

कुर्ला येथील मोक्याची जागा नवाब मलिक यांनी काही लाख रुपयांना दाऊदच्या संबंधित लोकांकडून खरेदी केली, असा आरोप नवाब मलिक यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर या व्यवहारात फराझ मलिक यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे समोर आले आहे त्यामुळे आता त्यांना ईडी समन्स पाठवण्याची शक्यता होती. फराझ मलिक यांनी स्वतः दक्षिण मुंबईतल्या हसीना पारकरच्या घरी जाऊन त्यावेळी पैसे दिले होते. ५ लाखांचा चेक आणि ५० लाख रुपयांची रोख फराझ मलिक यांनी हसीना पारकरला सोपवली होती. त्यावेळी हसीना पारकरसोबत तिचा निकटवर्तीय सलीम पटेल हाही होता. तसेच फराझ यांच्यासोबत त्यावेळी आणखी दोन माणसे होती. त्यातील एक व्यक्ती नवाब मलिक यांचे भाऊ अस्लम मलिक हे होते.

हे ही वाचा:

युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार केंद्रीय मंत्री

रशियाच्या हल्ल्यात जगातील सर्वात मोठं विमान उद्ध्वस्त

श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयासह भारताने रचले हे नवे विक्रम

युक्रेनमधील भारतीयांच्या सुटकेसाठी पंतप्रधान मोदींनी घेतली बैठक

आजच राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना जेजे रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सकाळी १० वाजता त्यांना ईडी कार्यालयात परत नेण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना २५ फेब्रुवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दाऊद इब्राहिम मनी लाँड्रिंग प्रकरणी नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Exit mobile version