मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीच्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आजही न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. नवाब मलिक यांच्या कोठडीत आता ४ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मात्र, पाठीचा त्रास होत असल्यामुळे नवाब मलिक यांना बेड, खुर्ची आणि चटई वापरण्याची मुभा न्यायालयाकडून देण्यात आली आहे.
नवाब मलिक यांना २३ फेब्रुवारी रोजी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांप्रकरणी ईडीने अटक केली होती. त्यांच्यावरती अंडरवर्ल्डचा कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमशी पैशांचा व्यवहार केल्याच्या आरोपांवरुन त्यांच्यावरती गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाने आधी ३ मार्चपर्यंत ईडीची कोठडी सुनावली होती. त्यानंतर झालेल्या सुनावणीत पुन्हा कोठडीत वाढ झाली होती आणि २१ मार्चपर्यंत कोठडी देण्यात आली होती. आज कोठडी संपत आल्यामुळे पुन्हा एकदा नवाब मलिक यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर ४ एप्रिल पर्यंत कोठडीत वाढ केली आहे. मलिकांनी बेड मिळावा यासाठी मुंबई सत्र न्यायालयाने अर्ज केला होता. त्यानुसार त्यांना बेड, खुर्ची आणि चटई वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
हे ही वाचा:
‘आम्ही म्हणायचे ठाकरे सरकार, मात्र लाभ घेते पवार सरकार’
लक्ष सेन स्पर्धा हरला, पण मने जिंकून गेला
काश्मीर फाईल्सच्या टीमने घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट
नवाब मलिक यांनी यापूर्वीही ईडीची कारवाई कायदेशीर नसल्याचे म्हटले होते. मात्र, ईडीने केलेली कारवाई योग्यच असल्याचे म्हणत न्यायालयाने नवाब मलिक यांना दणका दिला होता. अशातच आता त्यांची न्यायालयीन कोठडी वाढवण्यात आल्याने नवाब मलिकांची सध्या तरी सुटका झालेली नाही.