नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी कॉर्डिलिया क्रूझवर ड्रग्सप्रकरणी छापेमारी केली आणि शाहरुख पुत्र आर्यन खान त्यात ताब्यात आला. पण तेव्हापासून शाहरुख खानचीही जेवढी तगमग झाली नसेल तेवढी ठाकरे सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची झालेली आहे. हे प्रकरण चर्चेत आल्यानंतर नवाब मलिकांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोपांची सरबत्ती करायला प्रारंभ केला. रोज एक पत्रकार परिषद घ्यायची आणि पत्रकारांकडे ‘हे घ्या आरोप’ म्हणत खळबळ उडवायची हे काम नवाब मलिक करत आले. पत्रकारही रोज नवे काहीतरी चघळायला मिळते आहे म्हणून मलिकांच्या आरोपांना महत्त्व देऊ लागले. त्याचा आज परिणाम असा झाला की, मलिक थेट समीर वानखेडे यांच्या कुटुंबावरच घसरले. आपण काहीही आरोप करावे आणि पत्रकारांनी ते छापावे किंवा टीव्हीवर आपली ही पत्रकार परिषद लाइव्ह दाखवावी अशी मलिकांची मालिकाच सुरू झाली.
या सगळ्या आरोपांत त्यांचा जावई समीर खान याला समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या अटकेची ठसठस आहे हे स्पष्ट आहे. अगदी नवाब मलिक कितीही त्याचा इन्कार करत असले तरीही. अन्यथा, नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप करण्यामागे आणखी काही कारणच असू शकत नाही. सुरुवातीला क्रूझ प्रकरणच गोलमाल आहे असे म्हणता म्हणता नवाब मलिक समीर वानखेडे यांची नोकरी घालविण्याची भाषा करू लागले. त्यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासा असेही सांगू लागले. इथवर ठीकही होते, पण हळूहळू त्यांनी समीर वानखेडे यांची नोकरी घालविण्याचा आपला इशारा प्रत्यक्षात आणण्यासाठी योजनाबद्ध पत्रकार परिषदा घेण्यास, त्याचप्रकारचे ट्विट्स करण्यास सुरुवात केली. कधी समीर वानखेडे यांचा जुना लग्नातला फोटो टाकायचा आणि पैचान कौन म्हणून ट्विट करायचे, कधी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा निकाहनामा टाकायचा आणि त्यांच्यावर आरोप करायचे, त्यांच्या वडिलांचे नाव दाऊद आहे यावरून रान पेटवायचे असे उद्योग मलिक यांनी सुरू केले. हे सगळे इतक्या थराला गेले की, सोशल मीडियावरचा एखादा पडीक नेटकरी आणि एक मंत्री हे एकाच पातळीवर आले. हे सगळे केवळ आणि केवळ खासगी स्वरूपाचे आरोप होते हे स्पष्ट होते तरीही त्यातून सनसनाटी निर्माण होत आहे, बातम्यांना चांगला टीआरपी मिळतो आहे म्हणून नवाब मलिक यांच्या या आरोपांना वारेमाप प्रसिद्धी दिली जाऊ लागली. त्यात एकही पत्रकार नवाब मलिकांना या आरोपांच्या आधारे तुम्ही पोलिसांत तक्रार का करत नाही, न्यायालयात का जात नाही, असे विचारण्याची हिंमत करत नव्हता. त्यामुळे फोटो, व्हीडिओ, जुनी कागदपत्रे याआधारे रोज नवे ‘पुराव्यां’चा रतीब टाकणे सुरू राहिले.
या सर्व आरोपातला तिय्यम दर्जाचा आरोप होता तो समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा. त्यांच्या वडिलांचे नावच दाऊद आहे, त्यामुळे खोटा दाखला सादर करून समीर वानखेडे यांनी नोकरी मिळविली असा दावा नवाब मलिक यांनी केला. त्याला वानखेडे कुटुंबियांनीही चोख जवाब दिला. समीर वानखेडे यांच्या वडिलांनीही आपले सर्व दाखले पत्रकारांना दाखवले तरी ते नवाब मलिक यांना मान्य नव्हते.
हे सगळे खासगी स्वरूपाचे आरोप एका मंत्र्याने करणे कितपत उचित होते हा महत्त्वाचा मुद्दा आहे. मलिक यांच्या ज्या काही तक्रारी आहेत, त्यांचे निराकरण योग्य मार्गानेच करणे आवश्यक होते पण त्यांनी पोलिस, न्यायालय असे कोणतेही मार्ग न निवडता पत्रकारांच्या माध्यमातून वानखेडे यांच्यावर केवळ आरोपांचा धुरळा उडवणे सुरू ठेवले. रोज उठून एका कुटुंबाची शोधून काढलेली कागदपत्रे शेअर करायची, शेरोशायरी करायची, त्यांचे लग्नातले फोटो टाकायचे आणि वेगवेगळ्या शंका उपस्थित करायच्या हे एका मंत्र्याला अजिबात शोभणारे नाही. मंत्री या नात्याने नवाब मलिक यांच्यावर राज्याची जबाबदारी आहे. त्या नात्याने ते राज्याचे एकप्रकारे पालक आहेत, पण अशी जबाबदार व्यक्ती एका कुटुंबावर वैयक्तिक स्वरूपाचे आरोप करते हे अत्यंत निंदनीय आहे. नवाब मलिक यांना खरोखरच काही कारवाई करायची आहे तर त्यांनी न्यायालयात जायला काहीही हरकत नव्हती, पण ते अद्याप गेलेले नाहीत. याचा अर्थ केवळ खळबळ उडविणे हाच त्यांच्या आरोपांमागील अर्थ आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, या सरकारच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणारे शरद पवार एक शब्दही बोलायला तयार नाहीत. एरवी केंद्रीय तपास यंत्रणा दबाव आणत असल्याची ओरड करणाऱ्या मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना मलिक दबाव आणत आहेत किंबहुना, वैयक्तिक स्वरूपाची बदनामी करत आहेत, हे कळू नये याचे आश्चर्य वाटते.
मंत्री या नात्याने प्रत्येकाची एक मर्यादा ठरलेली असते. सरकारमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका होईल, आक्षेप घेतले जातील तेव्हा त्याला राजकीय स्वरूपाचे उत्तर देता येईल, पण एका कुटुंबावर ज्यांचा सरकारशी थेट कोणताही संबंध नाही, त्यांनी सरकारवर कोणतीही टिप्पणी केलेली नाही, त्या कुटुंबाला आपल्या ताकदीच्या जोरावर प्रसारमाध्यमांच्या आधारे बदनाम करणे हे अत्यंत आक्षेपार्ह आणि गुन्हेगारी स्वरूपाचे कृत्य आहे. एखाद्या जुलमी राजाने प्रजेला आपल्या ताकदीच्या जोरावर छळणे आणि नवाब मलिक यांची कृती यात किंचितही फरक नाही. असाच मर्यादाभंग केला तो दुसरे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केल्यावर ‘सांभाळून राहा, इतिहास बाहेर काढला तर लक्षात येईल की हमाम मे सब नंगे है’ असे प्रत्युत्तर दिले. हे तर नवाब मलिक यांच्यापेक्षाही निंदनीय होते. इथे तर एका महिलेला तोही मंत्रिपदावर बसलेला व्यक्ती सूचक शब्दांत ‘समज’ देतो याचा अर्थ काय घ्यायचा? असेच वक्तव्य एखाद्या भाजपा कार्यकर्त्याने किंवा नेत्याने केले असते तर तात्काळ तथाकथित पुरोगामी, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करण्याचा दावा करणाऱ्यांनी आकाशपाताळ एक केले असते. स्त्रीवाद्यांनी सोशल मीडियावरच्या आपल्या ‘भिंती’ रंगवल्या असत्या पण ही सगळी मंडळी एकही शब्द न बोलता गप्प बसून राहिली.
वानखेडे हे भाजपाचे तर नेते नाहीत किंवा कार्यकर्तेही नाहीत. तरीही त्यांच्यावर चिखलफेक केली जाते आणि त्याविरोधात ब्र काढला जात नाही. समीर वानखेडे यांनी आर्यन खानचे म्हणे अपहरण केले आहे, असा दावा काँग्रेसच्या भाई जगताप यांनी केला. हे तर हास्यास्पदच होते. सोशल मीडियावर आपण जबाबदार नेते म्हणून काय लिहावे, याचे जरा भान बाळगणे आवश्यक आहे.
समीर वानखेडे यांनी घरातून आर्यनला उचलून कुठेतरी नेले आणि खंडणी मागितली असे झालेले नाही. जे काही आहे ते न्यायालयात आहे. न्यायालयाला त्यात चुकीचे वाटले तर ते योग्य ते आदेश देतील. समीर वानखेडे हे काही सचिन वाझेसारखे उगाचच महत्त्व वाढवलेले अधिकारी नाहीत. ते केंद्रीय सेवेतून या पदापर्यंत पोहोचले आहेत. एनसीबी हे काही राजकीय नेत्याप्रमाणे त्यांचे स्वतःचे प्रतिष्ठान वगैरे नाही. कायदेशीर पद्धतीनेच सारी कारवाई ते करत आहेत. त्यात वावगे काही असेल तर न्यायालय नक्कीच त्यांना खडसावेल, ताशेरे ओढेल.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमध्ये बस दरीत कोसळली; ८ जणांनी गमावले प्राण
पालिकेत ‘भंगार’ रॅकेट; लिलाव करणाऱ्याचा आणि लाभार्थ्याचा पत्ता एकच!
दिवाळीच्या सुट्ट्यांवरून शिक्षण विभागाचे निघाले दिवाळे
आज ज्ञानदेव वानखेडे, समीर वानखेडे यांच्यावर बेलाशक कोणतेही आरोप केले जात आहेत मग सर्वसामान्य जनतेने पाहायचे तरी कुणाकडे? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन भाषण देताना घाबरू नका, सरकार तुमच्या पाठीशी आहे, असा दिलासा देण्याचा नेहमी प्रयत्न करतात मग या ‘पाठीशी आहेत’चा अर्थ तरी काय घ्यायचा?
महत्त्वाचे म्हणजे यात पत्रकारांची भूमिकाही भुवया उंचवायला लावणारी आहे. मलिक यांनी आरोप करायचे आणि ते दाखवून खळबळ उडवून द्यायची यापलिकडे पत्रकारांनी काहीही केले नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मलिक यांनी केलेली ट्विट्स काही प्रथितयश पत्रकारांनी रिट्विट केली. पत्रकार आपल्या भूमिकाही विसरले आहेत की काय? ज्ञानदेव वानखेडे आपली सगळी कागदपत्रे दाखवत असताना त्याच अनुषंगाने कुणीही मलिक यांना प्रश्न विचारल्याचे दिसले नाही. उलट मलिकांनी प्रश्न विचारला रे विचारला की, तो घेऊन वानखेडे यांच्याकडे जायचे आणि त्यांना जाब विचारायचा हे उफराटे काम पत्रकार करत राहिले. हा सगळा प्रकारच अत्यंत उबग आणणारा आहे. एक मात्र खरे की, सर्वसामान्य जनतेच्या मनात आता या सरकारविषयी भीती निर्माण झाली असेल तर त्यात चुकीचे असे काही नाही. कारण उद्या कुणाचेही फोटो असे ट्विट केले जाऊ शकतात, त्याचे दाखले टाकले जाऊ शकतात, त्यांची जाहिररीत्या मीडिया ट्रायल घेतली जाऊ शकते. अजूनही नवाब मलिक पिक्चर अभी बाकी है वगैरे भाषा बोलत आहेत. तर तिकडे क्रांती रेडकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली आहे. ती ऐकून मुख्यमंत्र्यांनी हा सुरू असलेला ‘पिक्चर’ लवकर बंद करावा. कारण असे पिक्चर फार काळ चालत नाहीत.