राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे गेल्या दोन दिवसांपासून ट्विटरवरून पुन्हा आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहेत. वानखेडे कुटुंबीयांची बदनामी केल्या प्रकरणी कोर्टात माफीनामा सादर करणाऱ्या मलिक यांनी आता विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. फडणवीस यांनी केंद्रीय तपास यंत्रणांचे ओएसडी व्हावे अशा प्रकारचा टोला नवाब मलिक यांनी लगावला आहे.
केंद्रीय तपास यंत्रणांनी माझ्या विरोधात कारवाई करावी यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूप जास्त रस घेत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. तर फडणवीस यांनी स्वतःची तपास यंत्रणांचे ओएसडी म्हणून नियुक्ती करून घ्यावी ते मुख्यमंत्री राहिले असल्यामुळे त्यांना अशा नियुक्त्या करायचा चांगला अनुभव आहे असे मलिक यांनी म्हटले आहे. तर त्याच वेळी त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरही निशाणा साधला आहे. सोमय्या यांनी तपास यंत्रणांचे प्रवक्ते व्हावे असे नवाब मलिक यांनी म्हटले. सोमवार, २० डिसेंबर रोजी नवाब मलिक यांनी या संदर्भात ट्विट केले आहे.
हे ही वाचा:
देशात फोफावतोय ओमिक्रोन; राज्यात ५४ बाधित रुग्ण
तुकाराम सुपेंच्या घरातून २ कोटी जप्त
हेमा मालिनी म्हणतात, अयोध्या, काशीनंतर मथुरा
दरम्यान याआधी रविवार, १९ डिसेंबर रोजी नवाब मलिक यांनी ट्विट करत उद्या आपल्या घरी काही पाहुणे येणार असल्याचे म्हटले होते. त्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आम्ही तयार आहोत, आम्ही चहा आणि बिस्कीट देऊन त्यांचे स्वागत करू असे ट्विट मलिक यांनी केले होते. तर त्यांना माझा योग्य पत्ता हवा असेल तर त्यांनी मला फोन करावा असे देखील मलिक यांनी लिहिले होते
नवाब मलिक यांच्या या ट्विटची चांगलीच चर्चा झाली असून नवाब मलिक यांच्या घरावर ईडीची धाड पडणार का? असा सवाल विचारला जात होता. पण अद्याप तरी अशा कोणत्याही धाडीची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.