नवाब मलिकांच्या जावयाला अटक…घरावर छापे!

नवाब मलिकांच्या जावयाला अटक…घरावर छापे!

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांच्या जावयाला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली आहे. मलिक यांचा जावई समीर खान याला ड्रग्स केसमध्ये १३ जानेवारी रोजी चौकशीसाठी बोलावले होते आणि चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर समीर खान यांच्या घरावरही छापे मारण्यात आले आहेत.

बुधवारी सकाळी समीर खान एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात एनसीबीने आंतरराष्ट्रीय ड्रग पेडलर करण सजनानी आणि त्याच्या दोन साथीदारांना २०० किलो ड्रग्ससहीत रंगे हात अटक केली. सजनानी आणि साथीदारांची एनसीबी कडून चौकशी सुरु असताना समीर खान सोबतची आर्थिक उलाढाल उघडकीस आली. त्यानंतर एनसीबीने समीर खानला चौकशीसाठी बोलावले. समीर खान आणि ड्रग्स केसमधील आरोपी यांच्यात २०,००० रुपयांचा आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने झाला. हा व्यवहार नेमका कशासाठी होता हे समोर आले नसल्यामुळे खानला चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. १३ जानेवारीला चौकशी नंतर समीर खान यांना अटक करण्यात आली आहे.

समीर खानच्या आधी एनसीबीने ‘मुच्छड पानवाला’ या दुकानाचा मालक रामकुमार तिवारीला अटक केली होती. या प्रसिद्ध पानाच्या दुकानात अनेक बड्या हस्ती येत असतात.

भाजपाच्या निशाण्यावर नवाब मलिक…राजीनाम्याची मागणी
समीर खानची अटक त्याचे सासरे आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना अडचणीची ठरत आहे. या अटकेच्या मुद्द्यावरून भाजपाने नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. भाजपा नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट करत नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Exit mobile version