राष्ट्रवादीचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक हे पुन्हा एकदा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि एनसीबीचे झोनल प्रमुख समीर वानखेडे यांच्यावर घसरले. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुन्हा एकदा एनसीबी आणि वानखेडे यांना लक्ष्य केले.
क्रूझवर झालेली कारवाई आणि त्यात पकडले गेलेले लोक ही सगळी बनावट कारवाई असल्याचा आरोपही मलिक यांनी यावेळी केला. एवढेच नव्हे तर एनसीबीकडून त्यांनी उत्तरे मागविली. ज्या तीन लोकांना क्रूझवरील कारवाईदरम्यान सोडले त्यांना का सोडले, कुणाच्या सांगण्यावरून सोडले याची उत्तरे एनसीबीने द्यावीत, अशीही मागणी ते करत होते.
मागे एनसीबीने या संपूर्ण प्रकरणात किती लोकांना अटक केली आहे, त्यांची नावे काय आहेत, त्यांच्याकडे कोणते आणि किती प्रमाणात अमली पदार्थ सापडले याची माहिती दिली होती. त्यावेळी पत्रकारांनी नवाब मलिक यांच्या आधीच्या पत्रकार परिषदेतील आरोपांबाबत विचारल्यावर एनसीबीने त्यावर कोणतेही भाष्य केले नव्हते. तरीही मलिक हे पुन्हा एकदा एनसीबीने उत्तरे द्यावीत अशी मागणी करत होते.
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंनी राणेंच्या कानात काय सांगितले?
‘चिपी विमानतळाला विरोध कुणी केला हे लोक जाणतात’
खो- खोपटू सारिका काळेने आपल्यावरील चित्रपटाचे मानधन खेळाडूंसाठी का दिले?
हज यात्रेला स्वस्तात पाठविण्याचे आमीष दाखविणारा पोलिसांच्या तावडीत
एवढेच नव्हे तर यासंदर्भात आता मुंबई पोलिसच सगळ्यांचे कॉल रेकॉर्ड्स काढून माहिती देतील असा धमकीवजा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेत दिला. त्यात वानखेडे यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासण्यात यायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली. याचा अर्थ मुंबई पोलिसांकडून आता वानखेडे यांचे रेकॉर्ड्स तपासण्याची प्रक्रिया सुरू होणार असेच संकेत मलिक यांनी दिले आहेत. गृहखाते हे राष्ट्रवादीकडे असल्यामुळे एकप्रकारे त्या माध्यमातून एनसीबीला कसे लक्ष्य करता येईल, याचाही प्रयत्न होण्याची चिन्हे दिसत आहेत.