राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी गुरुवार, १८ नोव्हेंबर रोजी नवी पुडी सोडली आहे. समीर वानखेडे यांच्यावर ते मुस्लीम असल्याचा आरोप करतानाच मलिक यांनी वानखेड यांचे शाळेचे दाखले पत्रकार परिषदेत सादर केले. तर समीर वानखेडे यांनी आपल्या पहिल्या पत्नीच्या भावाला खोट्या आरोपात अडकवल्याचेही मलिक यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. वानखेडे हे मुस्लिम असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला होता. तर त्यांच्या वडिलांचे नाव नामदेव नसून दाऊद वानखेडे आहे असे देखील मलिकांनी आरोप केले होते. त्यानुसार सध्या कोर्टात केस चालू असून त्याचा केसचा आज फैसला होणार आहे.
हे ही वाचा:
तळपत्या ‘सूर्या’ च्या किवींना झळा
मुंबईत हिवसाळा; दक्षिण मुंबईत पावसाने लावली जोरदार हजेरी
मोदी पंतप्रधान झाल्यापासून महिलांची सैन्यातील भूमिका वाढली
पण अशातच नवाब मलिक यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे हे मुसलमान असल्याचे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या शाळांचे दाखले सादर केले आहेत. दादर येथील सेंट पॉल हायस्कूल आणि वडाळा येथील सेंट जोसेफ हायस्कूल या दोन शाळांचे हे दाखले असून यावर समीर वानखेडे यांचे पूर्ण नाव समीर दाऊद वानखेडे असे लिहिण्यात आले आहे. तर धर्माच्या रकान्यात मुस्लिम असे लिहिले आहे. ही कागदपत्रे कोर्टातही सादर करणार असल्याचे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.
नवाब मलिक यांच्या आरोपानंतर समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी त्यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सादर केली असून कोर्टात देखील त्यांनी ही कागदपत्रे सुपूर्त केली आहेत. तर मुंबई महापालिकेकडूनही न्यायालयात वानखेडे यांच्याशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. या संपूर्ण प्रकरणात कोर्ट काय निकाल देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.