राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना धमकीचे पत्र मिळाले आहे. ‘टीव्ही ९’ने दिलेल्या वृत्तानुसार नवाब मलिक यांना धमकी देणारे पत्र मिळाले असून पत्रात अश्लील भाषा वापरली आहे. यासंबंधी नवाब मलिक यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे तक्रार केली आहे.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने आरोप केल्याने आपण पत्र लिहीत असल्याचा उल्लेख या पत्रात आहे. समीर वानखेडे यांची माफी मागितली नाही तर कार्यकर्त्यांसह मलिक यांच्या घरावर हल्ला करणार असल्याचा इशारा या पत्रातून दिला आहे. हे पत्र कोणी लिहिले आहे याबाबतची सध्या कोणतीही माहिती नसून मंत्री नवाब मलिक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून या प्रकरणाचा तपास करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
ओमिक्रॉनचा पहिला बळी; ब्रिटनमध्ये झाली नोंद
‘हा विजय म्हणजे महाविकास आघाडीला चपराक’
अकोल्यात शिवसेनेला धक्का; वसंत खंडेलवाल विजयी
दरम्यान, ऑक्टोबर महिन्यात नवाब मलिक यांना एका निनावी फोन वरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. राजस्थानमधून हा फोन आल्याचा मलिक यांनी म्हटले होते. समीर वानखेरे चांगले काम करत आहेत. त्यांच्या कामात अडथळा आणू नका. अशी धमकी मलिक यांना देण्यात आली होती. या धमकीनंतर मलिक यांनी पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली होती.
मुंबईतील क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने केलेल्या कारवाईवर नवाब मलिक आरोप केला आहे. शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून मलिक हे पत्रकार परिषद घेत एनसीबीवर आणि समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही जीवे मारण्याची धमकी देणारे पत्र आले होते. पत्रात वेगवेगळ्या व्यक्तींची नावे असून पत्तेही वेगवेगळे होते.