भाजपाचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत

नवाब मलिक यांच्या महायुतीमध्ये असण्याला भाजपाकडून जाहीरपणे विरोध करण्यात आला होता

भाजपाचा विरोध झुगारून नवाब मलिक अजित पवारांच्या बैठकीत

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांची आणि आमदारांची बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजित पवारांचे शासकीय निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ बंगल्यावर ही बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील यांच्यासह इतर नेते हजर होते. मात्र, या बैठकीला पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक हे देखील हजर होते. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

नवाब मलिक यांच्या महायुतीमध्ये असण्याला भाजपाकडून जाहीरपणे विरोध करण्यात आला होता. मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात अटकेची कारवाई झाल्यानंतर काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक हे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर असलेल्या आरोपांमुळे त्यांना महायुतीमध्ये घेण्यात येऊ नये असे भाजपाने सांगितले होते. अशातच अजित पवारांनी नवाब मलिक यांना बैठकीस बोलावल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपात नवाब मलिक यांच्यावर महाविकास आघाडी सरकारच्या काळात अटकेची कारवाई झाली होती. काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय कारणास्तव नवाब मलिक हे जामिनावर तुरुंगाबाहेर आले आहेत. तुरुंगाबाहेर येताच नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आपलं समर्थन दिलं होतं. तसंच अधिवेशन काळात ते सत्ताधारी बाकांवरही बसले होते. मात्र, गंभीर आरोप असलेले नवाब मलिक हे महायुतीसोबत नकोत, अशी भूमिका घेत भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांना पत्र लिहिलं होतं. यानंतर मलिक यांना पक्षाच्या बैठकांपासून दूर ठेवण्यात आलं. परंतु आता पुन्हा एकदा नवाब मलिक हे राष्ट्रवादीच्या बैठकीला हजर झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवारांनी बोलावलेल्या बैठकीत आमदारांसोबत विधानपरिषद निवडणुकीबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. तसंच लोकसभा निवडणुकीत आलेलं अपयश दूर सारून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात, याबाबत बैठकीत चर्चा झाली.

हे ही वाचा:

पुण्यात झिका रुग्णांची संख्या सातवर

शेअर बाजाराची ऐतिहासिक झेप; सेन्सेक्सची ८०,००० पार उसळी

अमरनाथ यात्रेकरूंसाठी लष्कराचे जवान बनले देवदूत; ब्रेक फेल झालेल्या बसला थांबवण्यात यश

बांसुरी स्वराज यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र; राहुल गांधींच्या वक्तव्यांवर कारवाईची मागणी

देवेंद्र फडणवीसांनी पत्रात काय म्हटलं होतं?

“नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य होणार नाही, असं आमचं स्पष्ट मत आहे. आपल्या पक्षात कोणाला घ्यायचे, हा सर्वस्वी आपला अधिकार आहे. हे मान्यच आहे. परंतु, त्यामुळे महायुतीला बाधा पोहोचणार नाही, याचा विचारही प्रत्येक घटक पक्षाला करावाच लागत असतो”

Exit mobile version