“नवाब मलिक तुम्ही मर्द असाल तर माझ्याऐवजी देवेंद्रजींना लक्ष्य करा.” असं खडसावत अमृता फडणवीस यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर मलिक यांना बिगडे नवाब असा टोलाही त्यांनी लगावला आहे. नवाब मलिक यांनी आज सकाळी लागवलेल्या आरोपांवर उत्तर देताना अमृता फडणवीस बोलत होत्या.
“मी एक समाजसेविका आहे. माझा राजकारणाशी दूर दूरचा संबंध नाही. रिव्हर मार्च या सामाजिक संस्थेने नद्यांसाठी चांगले काम केले आहे. त्यासाठीच मी रिव्हर अँथेम गाण्याच्या प्रोजेक्टचा एक भाग होते. या प्रोजेक्ट्मधे आम्ही एकही पैसे न घेता कामी केलं होतं. अशा चांगल्या संस्थेच्या चांगल्या कामाबद्दल जर तुम्ही असे आरोप करणार असाल तर मात्र मी तुम्हाला सोडणार नाही.” असंही त्या म्हणाल्या.
दिवाळीच्या आधी लवंगी फटाका लावून खूप मोठा आवाज झाल्याचा आव नवाब मलिक आणतायंत असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तर त्यांनी लवंगी लावून सुरूवात केली आहे. पण दिवाळी नंतर बाॅम्ब मी फोडेन असे देखील फडणवीस यांनी सांगीतले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीचा फोटो ट्विट करत भाजपाचे ड्रग्स कनेक्शन असे म्हटले होते. यावरूनच फडणवीस आक्रमक झाले असून त्यांनी नवाब मलिकांवर पलटवार केला आहे.
एनसीबीने अटक केलेल्या जयदीप राणा नामक एका ड्रग्स पेडलरचा अमृता फडणवीस यांच्यासोबतचा फोटो नवाब मलिक यांनी ट्विट केला होता. यावेळी ‘आज भाजपा आणि ड्रग्स पेडलर यांच्या कनेक्शनची चर्चा करूया’ असे मलिक म्हणाले होते. मलिक यांनी पोस्ट केलेल्या फोटोतील जयदीप राणा हा इसम अमृता फडणवीस यांनी गायलेल्या रिव्हर अँथेम गाण्याच्या प्रोजेक्टचा एक भाग होता. पण यावर रिव्हर मार्च या सामाजिक संस्थेने खुलासा केला असून आम्ही त्याला आमच्या प्रकल्पासाठी हायर केल्याचे म्हटले आहे. नदी बचावासाठी कार्य करणाऱ्या या संस्थेच्या रिव्हर अँथेम या प्रकल्पात देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस यांनी जनजागृतीसाठी सहभाग नोंदवला होता. या वेळी संपूर्ण चमूने त्यांच्यासोबत फोटो काढले होते. या व्यतिरिक्त त्या व्यक्तीशी फडणवीस दाम्पत्याचा कोणताही संबंध आला नाही.
हे ही वाचा:
संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेसाठी भारताचे मोठे पाऊल
राकेश टिकैत यांची पुन्हा एकदा सरकारला धमकी
निवडणुकीपूर्वीच समाजवादी पक्षाने हार पत्करली?
रिव्हर अँथेमच्या निमित्ताने माझ्यासोबत आणि माझ्या पत्नीसोबत काढलेला एकमेव फोटो ट्विट करत नवाब मलिक याला भाजापाचे ड्रग्स कनेक्शन म्हणतात. जो फोटो चार वर्षांपूर्वीचा आहे. या इसमाला एनसीबीने चार वर्षांनंतर अटक केली आहे. पण तरी जर याला भाजपाचे ड्रग्स कनेक्शन म्हणत असतील तर नवाब मलिक यांचा जावई तर ड्रग्स सोबत सापडला आहे. मग या हिशोबात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ड्रग्स माफियांचा पक्ष म्हणायचे का? असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.