महाराष्ट्रात अल्पसंख्यांक विकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी मार्फत मालिकांना अटक केली आहे. गेल्या साडे आठतासांपासून मलिक यांची ईडी मार्फत चौकशी सुरू असून आता या चौकशी अखेर त्यांना अटक करण्यात आली आहे. लवकरच त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. तिथे त्यांची कोठडी मागितली जाऊ शकते.
बुधवार, २३ फेब्रुवारी रोजी सकाळपासूनच मलिक यांची चौकशी ईडी मार्फत केली जात होती. पहाटे ४.३० वाजता ईडी अधिकाऱ्यांचे पथक मलिक यांच्या मुंबई येथील निवासस्थानी दाखल झाले असून त्यांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर सकाळी ७.४५ वाजता मलिकांच्या चौकशीला सुरुवात झाली असून गेले काही तास चौकशी सुरू होती.
हे ही वाचा:
‘थयथायाट तीच लोक करतात जे उत्तर देऊ शकत नाहीत’
शरद पवारांची उडी अजूनही जात, धर्मापलीकडे जात नाही
मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते
‘दाऊद सबंधितांशी नवाब मलिकांचे व्यावसायिक संबंध’
नवाब मालिक यांना करण्यात आलेली अटक ही महाविकास आघाडीला मोठा झटका मानला जात आहे. अनिल देशमुख यांच्यानंतर आता नवाब मलिक यांच्या रूपाने महाविकास आघाडीतील आणखीन एक मंत्री अटकेत आहेत. तर नवाब मलिक यांच्यावर झालेली कारवाई सुडबुद्धीने होत असल्याचे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीचा नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमशी संबंधित जमीन नवाब मलिक यांच्याशी संबंधित कंपनीने विकत घेतल्याच्या प्रकरणात मलिक यांची ईडी चौकशी सुरू होती. या प्रकरणात इक्बाल कास्कर यालाही ईडीने अटक केली आहे. कास्कर नंतर आता याच प्रकरणात नवाब मलिकांनाही अटक करण्यात आली आहे. मलिक आणि कास्कर यांची समोर समोर बसवून चौकशी करण्यात आल्याचेही बोलले जात आहे. तर मलिक यांना किती दिवसांची कोठडी सुनावली जाणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.