सचिन वाझे याचे मुंबई पोलिसांपासून संरक्षण करा अन्यथा त्याचाही मनसुख हिरेन होईल अशी भीती खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली आहे. वाझे यांनी तोंड उघडले तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊ शकतो. तेव्हा एनआयएने त्यांचे संरक्षण करावे असे राणा यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात सध्या उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असून एनआयए या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहे. रोज या विषयात नवे गौप्यस्फोट होत आहेत. या प्रकरणावरून महाराष्ट्राचे राजकारणही चांगलेच तापले आहे. विरोधक रोज वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ठाकरे सरकारची पिसे काढताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
ममतांच्या ‘खेला होबे’ला मोदींच्या ‘विकास होबे’ने उत्तर
राजकीय भूकंपाची शक्यता, दोन मंत्र्यांची होणार एनआयएकडून चौकशी?
दिल्लीत फडणवीस, मोदी, शाह यांची बैठक
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी गुरुवारी एका व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. “वाझेंच्या चौकशीतून एनआयएच्या हाती अनेक गोष्टी आल्या आहेत. यामुळेच मुंबई पोलिसांची तडकाफडकी बदली करण्यात आली. या प्रकरणामुळे सरकारमध्ये खळबळ माजली आहे. उद्धव ठाकरे सरकारला माहीत आहे की जर सचिन वाझेने तोंड उघडून सगळ्या गोष्टी कबुल केल्या तर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल.” असे राणा यांनी म्हटले आहे.
“जर महाराष्ट्र सरकार यात सहभागी नसेल तर मुंबई पोलिस आयुक्तांची बदली का केली?” असा सवाल राणा यांनी केला आहे. “एनआयएने सचिन वाझे यांचे मुंबई पोलिसांपासून संरक्षण करावे अन्यथा त्याचा मनसुख हिरेन होईल. येणाऱ्या काळात या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होणार असून यात अनेक नेत्यांची नावे बाहेर येतील ज्याचे कनेक्शन थेट मातोश्रीपर्यंत जाते.” असेही राणा म्हणाल्या.