अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण केले. त्यापूर्वी राणा दाम्पत्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ज्या-ज्या ठिकाणी हनुमान चालीसा बोलता येईल त्या ठिकाणी हनुमान चालीसा बोलणार असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले. हनुमान चालीसा पठणानंतर त्यांनी महाआरती देखील केली.
मंदिरात जाण्यापूर्वी राणा दाम्पत्याने माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. “महाराष्ट्रातील सर्वात मोठं संकट म्हणजे उद्धव ठाकरे असून महाराष्ट्र संकटमुक्त होण्यासाठीच हनुमान चालिसा पठण करण्यात येत आहे,” असा सणसणीत टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. “मी घाबरणार नाही, थकणार नाही. महिलांना घाबरवून जेलमध्ये डांबणं हे मान्य नाही तसेच इतकी कमजोर देशातील स्त्री मुळीच नाही,” असे नवनीत राणा म्हणाल्या.
तुम्ही मला फक्त वज्रमूठ द्या, दात पाडायचे काम मी करून दाखवतो, असे आवाहन शिवसेनेने त्यांच्या आजच्या सभेपूर्वी केले आहे. यावरून नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. “हिंमत असेल तर आधी औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांचे दात तोडून दाखवा, तेव्हा तुम्हाला मानेल,” असा टोला नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
दरम्यान, नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा हनुमान मंदिरात हनुमान चालीसा आणि आरतीचे पठण करण्यासाठी दिल्लीत पोहचल्यावर त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात उपस्थित असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी समर्थकांनी ‘जय श्रीराम’ च्या घोषणाही लगावल्या.
हे ही वाचा:
शरद पवारांविषयीची पोस्ट केतकी चितळेला भोवणार; गुन्हा दाखल
… आणि चंद्राच्या मातीत फुलली बाग
दिल्लीत इमारतीला भीषण आग; २७ जणांचा मृत्यू
यूएईचे अध्यक्ष शेख खलिफांचे निधन
सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यावरुन राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यात काही दिवसांपूर्वी राणा दाम्पत्याने मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाले होते. दरम्यान पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांना अटक केली होती. अखेर त्यांना सशर्त जामीन मंजूर करण्यता आला.