अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. राजद्रोहाच्या आरोपात अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याच्या अर्जावर आज, २६ एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, आजच्या सुनावणीत राणा दाम्पत्याला न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही.
राणा दाम्पत्याच्या जामिन अर्जावर २९ एप्रिलपर्यंत राज्य सरकराने उत्तर द्यावे, त्यानंतर अर्जावर सुनावणी घेण्याची तारीख ठरवली जाईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे राणा दाम्पत्याचा कारागृहातील मुक्काम आता २९ एप्रिल पर्यंत वाढला आहे.
राणा दाम्पत्याकडून मुंबईतील सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल करण्यात आला. या अर्जावर सुनावणी सुरू असताना राणा दाम्पत्याचे वकील अॅड रिझवान मर्चंट यांनी जामीन देण्याची मागणी केली. तर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी जामीनाला विरोध केला. आधी मॅजिस्ट्रेट कोर्टातून अर्ज मागे घ्यावा नंतर सुनावणी करावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली. २७ एप्रिलला सरकारी वकील मुंबई सत्र न्यायालयात आपले म्हणणे लेखी स्वरुपात मांडेल आणि त्यानंतर २९ एप्रिलला जामिन अर्जावर सुनावणी होईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हे ही वाचा:
राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये जमावबंदी
एलआयसी आयपीओची विक्री या तारखेला होणार
भारताविरोधी प्रसार करणारे १६ युट्यूब चॅनल्स ब्लॉक
दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून त्यांना अमानवीय वागणूक दिल्याची तक्रार केली होती. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी राज्य सरकारकडून २४ तासांमध्ये सविस्तर माहिती मागवली आहे.