मुख्यमंत्री म्हणून नव्हे; बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून चर्चा केली

मुख्यमंत्री म्हणून नव्हे; बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून चर्चा केली

नवी मुंबई विमानतळ नामांतर वाद

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरणासंदर्भात वाद दिवसागणिक अधिकच वाढू लागलेला आहे. यावरच तोडगा काढण्यासाठी संघर्ष समिती आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक निष्फळ ठरली. त्यामुळेच नवी मुंबई विमानतळ नामकरण मुद्दा आता दिवसागणिक अधिकच चिघळताना दिसत आहे.

एकीकडे शिवसेनेकडून दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात यावे,अशी मागणी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मात्र या विमानतळाला स्थानिकांकडून रायगडमधील लोकप्रिय नेते दिनकर बाळू पाटील यांचे नाव देण्यात यावे असे मत व्यक्त करण्यात येत आहे. याकरता रायगडवासियांनी आंदोलनाची सुद्धा तयारी आता केलेली आहे. २४ जूनला रायगडवासियांनी आंदोलनाचे हत्यार आता उपसले आहे. म्हणूनच या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या मध्यस्थीने वर्षा निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

हे ही वाचा:

यूपीएला बाजुला ठेवत राष्ट्रमंच नावाची तिसरी आघाडी

१००० हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मौलानांना बेड्या

प्रदीप शर्मा आणि अन्य चौघांच्या समोर सुनील मानेची चौकशी

उद्धव ठाकरेही आता ‘सामना’ वाचत नाहीत

या बैठकीस नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांच्या विनंतीनुसार बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. या बैठकीत कृती समितीचे म्हणणे ऐकून न घेताच मुख्यमंत्री निघून गेल्यामुळे हा मुद्दा अधिकच ताणला जात आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध असेल तर शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला असे कृती समितीचे अध्यक्ष रामशेठ ठाकूर यांनी सांगितले. परंतु काहीही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही, असाच पवित्रा आता कृती समितीने घेतला असल्याचे यावेळी रामशेठ ठाकूर यांनी सांगितले.

शिवसैनिक रस्त्यावर उतरतील, अशी भाषा मुख्यमंत्र्यांनी करणे हा दि. बा. पाटील व त्यांच्या कार्याचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री म्हणून नव्हे, तर बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून चर्चा केली. त्यामुळे आता हा संघर्ष अधिक चिघळणार. आंदोलन कितीही दडपण्याचा प्रयत्न केला तरी आंदोलन करण्यावर ठाम असल्याचे यावेळी प्रशांत ठाकूर म्हणाले.

डिसेंबरमध्ये राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोला पत्र लिहून बाळासाहेब ठाकरे यांचे नाव पाठविले. त्यानंतर सिडकोने आपल्या बोर्डाच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर केला. परंतु या निर्णयावर स्थानिकांनी जोरदार आक्षेप घेतला. या एकूणच नामकरण मुद्यावरून आता जनआंदोलनाची साद रायगडवासियांनी घातलेली आहे. २४ जूनला सिडकोला घेराव घालण्याचा मानस या स्थानिकांचा आहे. सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून पनवेल-बेलापूर, नवी मुंबई, दिघा, ठाणे आदी ठिकाणी मानवी साखळी आंदोलन करण्यात येणार आहे.

Exit mobile version