ओदिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अंतिम टप्प्यात मतदानाआधी नवीन वाद समोर आला आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या एका व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर भाजपने सत्ताधारी बिजू जनता दलाला लक्ष्य केले आहे. या व्हिडीओत मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे खासगी सचिव व्ही. के. पांडियन त्यांचा हात कॅमेऱ्यापासून लपवताना दिसत आहेत.
‘मुख्यमंत्री म्हणून नवीन पटनायक यांचा कार्यकाळ अविस्मरणीय ठरला आहे. मात्र ही बाब अस्वस्थ करणारी आहे. त्यांचा देखावा करण्यासाठी कशाप्रकारे त्यांना प्रेरित केले जात आहे, हे अतिशय दुर्दैवी आहे. ओदिशाला याची जाणीव आहे. या निवडणुकीत या अनुभवी राजकारण्याला आणि बिजू जनता दलाला एक सन्मानजनक निरोप देणेच खरी श्रद्धांजली ठरेल,’ अशी प्रतिक्रिया आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी दिली आहे.
नवीन पटनायक यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात व्ही. के. पांडियन हे माइक पकडून आहेत. जेव्हा त्यांना कळते की डायसला पकडून असलेल्या मुख्यमंत्र्यांचा एक हात हलत आहे, तेव्हा ते त्याला लपवतात. या व्हिडीओवरून भाजपने बीजेडी आणि विशेषतः पांडियन यांना लक्ष्य केले आहे.
पांडियन गेल्या काही दिवसांपासून भाजपच्या रडारवर आहेत. काही दिवसांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ओदिशा दौऱ्यावर असता त्यांनीही पांडियन यांना लक्ष्य केले होते. ‘बिजू जनता दल ओदिशामध्ये पाच टीच्या गप्पा मारतात. मात्र येथे केवळ दोनच टी आहेत. एक पांडियन आणि दुसरी पांडियन यांची पत्नी. अजून कोणतीही शक्ती ओदिशात नाही. बिजू जनता दलतामध्ये पांडियन हे दुसऱ्या क्रमांकाचे नेते मानले जातात,’ अशी टीका सरमा यांनी केली होती.
हा व्हिडीओ आल्यानंतर सरमा यांनी पुन्हा टीका केली आहे. ‘हा अतिशय दुःखदायक व्हिडीओ आहे. व्हीके पांडियन तर नवीन बाबू यांच्या हातांवरही नियंत्रण मिळवत आहेत. तमिळनाडूचे माजी नोकरशाह वर्तमानात ओदिशाच्या भविष्यावर कशा प्रकारचे नियंत्रण मिळवत आहेत, हे पाहून मी हादरलो आहे. भाजप राज्यातील लोकांना राज्याची सूत्रे पुन्हा सोपवण्यासाठी कटिबद्ध आहे,’ असे त्यांनी म्हटले होते.
हे ही वाचा:
‘आप’चा पाय खोलात; मानहानीच्या खटल्यात आतिशी यांना समन्स
विरारच्या अर्नाळा समुद्रात बोट उलटली, एकाचा मृत्यू!
पावसाळ्यातील संकटांना तोंड देण्यास यंत्रणा सज्ज
दिल्लीतील आग; मालकाने परवान्याशिवाय चालवली चक्क तीन रुग्णालये
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही ओदिशात तमिळनाडूचा माणूस ओदिशाचा मुख्यमंत्री होणार का, असा प्रश्न उपस्थित केला होता. ओदिशात १ जून रोजी सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होत आहे. ओदिशात सहा लोकसभा आणि ४२ विधानसभेच्या जागांवर मतदान होत आहे.