लाल किल्ल्यात धिंगाणा घातल्यानंतर आता चक्का जामचे आवाहन

लाल किल्ल्यात धिंगाणा घातल्यानंतर आता चक्का जामचे आवाहन

दिल्लीच्या सीमेवर आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी ६ फेब्रुवारी रोजी तीन तास देशभरात चक्का जाम करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प करण्याचे ठरवले आहे.

केंद्र सरकारने सप्टेंबर महिन्यात लागू केलेल्या तीन कृषी सुधारणा कायद्यांच्या विरोधात चक्का जाम करण्यात येणार आहे. त्यासोबतच खंडित करण्यात आलेली इंटरनेट सुविधा, दिल्लीच्या सीमांवर उभे करण्यात आलेले मोठ्या प्रमाणातील बॅरिकेड्स यांच्या विरोधात देखील आंदोलक चक्का जाम करणार आहेत. 

चक्का जाम करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चातर्फे (एसकेएम) करण्यात आली आहे.  एसकेएमचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या बैठकीत तरूण शेतकऱ्यांवर पोलिस करत असलेले अत्याचार, जप्त केलेल ट्रॅक्टरबद्दल काहीच माहिती न कळणे, खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा आणि इंटरनेट सेवा आणि रस्त्यावर बॅरिकेड्स उभारून निर्माण करण्यात आलेले अडथळे या सर्वांबद्दल चर्चा करण्यात आली. 

“रेल्वेने या स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील छळ करण्यात आला. आम्हाला या सर्व प्रकारच्या छळवणुकींविरूद्धचा निषेध व्यक्त करत आहोत. त्यामुळे आम्ही तीन तासांचा चक्का जाम करण्याचा निर्णय घेतला आहे. ६ फेब्रुवारी रोजी राज्य महामार्ग आणि राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतूक ठप्प करण्यात येईल.”

शेतकरी आंदोलकांनी दिल्लीच्या गाझिपूर हद्दी जवळील आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राकेश टिकैत यांनी जोपर्यंत शेतकरी कायदे रद्द केले जाणार नाहीत तोवर आंदोलन रद्द करण्यात येणार नाही असे ठासून सांगितले. 

Exit mobile version