राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी दिल्लीतील नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती व्याख्यानमालेत बोलताना ‘नेताजी हयात असते तर भारताची फाळणी झाली नसती,’ असे वक्तव्य केले. यावेळी डोवाल यांनी बोस यांनी त्यांच्या आयुष्याच्या विविध टप्प्यांवर दाखवलेल्या धैर्याबद्दल त्यांचे कौतुक केले. ‘सुभाषचंद्र बोस यांच्यात महात्मा गांधींना आव्हान देण्याचे धाडस होते,’ असेही ते म्हणाले.
“मी चांगले किंवा वाईट म्हणत नाही. परंतु भारतीय इतिहासात आणि जगाच्या इतिहासात असे लोक फार कमी आहेत, ज्यांच्यात प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे धाडस होते. त्यांचे धाडस अतुलनीय होते. बोस यांचा निर्णय पक्का होता. मी इंग्रजांशी लढेन, पण मी स्वातंत्र्याची भीक मागणार नाही. तो माझा अधिकार आहे आणि तो मला मिळवावाच लागेल. सुभाष बोस असते तर भारताची फाळणी झाली नसती. जिना म्हणाले होते, मी फक्त एकच नेता स्वीकारू शकतो आणि तो म्हणजे सुभाष बोस,” याची आठवण डोवाल यांनी करून दिली.
हे ही वाचा:
१८० देशांमधील व्यक्तींसमोर मोदी करणार योग
काँग्रेसची बैठक आटोपून नाना पटोले निघाल्यावर कार्यकर्त्यांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी
गुजरात दंगल : मिडीयाच्या दबावात हिंदूना गोवले
बिहारमध्ये उष्माघाताने २४ तासांत ३५ जणांचा मृत्यू
“नेताजी म्हणाले होते की, मला पूर्ण स्वातंत्र्यच हवे आहे आणि स्वातंत्र्यापेक्षा कमी कशासाठीही तडजोड करणार नाही. त्यांना या देशाला केवळ राजकीय अधिपत्यापासून मुक्त करायचे नव्हते, तर त्यांना लोकांची राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक मानसिकता बदलायची होती. लोकांना आकाशातील मुक्त पक्ष्यांसारखे वाटले पाहिजे, अशी त्यांची इच्छा होती,” असे ते म्हणाले. नेताजी सुभाषचंद्र बोस १८ ऑगस्ट १९४५ रोजी बेपत्ता झाले होते. त्याच दिवशी तैवानमध्ये झालेल्या विमान अपघातात बोस यांचा मृत्यू झाला, असे मानले जाते.