मणिपूरमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जातीय संघर्ष उसळला आहे. संपूर्ण मणिपूर पेटले आहे. मात्र आता द युनायटेड पीपल्स फ्रंट (यूपीएफ), कुकी नॅशनल ऑर्गनायझेशन (केएनओ) या कुकी गटाच्या संघटनांनी दोन महिन्यांपासून बंद केलेला मणिपूरमधील कांगपोक्पी जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग २ अखेर मोकळा केला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्य आवाहनानंतर हा रस्ता मोकळा करण्यात आला, असे या दोन संघटनांनी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे. सरकारसोबत झालेल्या करारानुसार, आम्ही आंदोलन थांबवत आहोत, असे या संघटनेने म्हटले आहे. तसेच, राज्यांत शांतता आणि सौहार्दाचे वातावरण पूर्ववत व्हावे, यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी तीव्र चिंता व्यक्त केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
मात्र दोन महिन्यांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग क्र. २ रस्ता बंद करण्याचे जाहीर करणाऱ्या कुकी समाजाच्या कमिटी ऑन ट्रायबल युनिटी (सीओटीयू) संघटनेने अधिकृतरीत्या रस्ता खुला करण्याचे जाहीर केलेले नाही. मणिपूरमध्ये दोन राष्ट्रीय महामार्ग आहेत. एक एनएच २ (इम्फाळ ते दिमापूर) तर, दुसरा एनएच- ३७ (इम्फाळ ते जिरिबाम). मणिपूरमध्ये ३ मे रोजी हिंसाचार उसळल्यापासून कुकी संघटनांनी एनएच २ बंद केला होता. त्यानंतर शाह यांच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर मे अखेरीस तो तात्पुरता खुला करण्यात आला.
त्यानंतर यूपीएफ, केएनओ आणि अन्य कुकी संघटनांची आसामचे मुख्यमंत्री हिमंताबिस्व सरमा यांच्याशी गुवाहाटीमध्ये चर्चा झाल्यानंतर हा रस्ता मोकळा करण्याचा निर्णय घेण्यात आला. नागरी संघटना, गावांचे प्रमुख आणि विविध प्रसंगांत नेतृत्व करणाऱ्या महिला नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचे या संयुक्त निवेदनात म्हटले आहे.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीकडून ९ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल
‘गोलमाल’मधील अभिनेते हरिश मैगन यांचे निधन
डिस्कस थ्रो स्पर्धेत ‘सीमा पुनियाने’ जिंकले ‘रौप्यपदक’!
मैतेई आणि कुकी समाजातील संघर्षात आतापर्यंत १०० जणांना जीव गमवावा लागला आहे. ‘कुकी झो संघटनांनी यापूर्वी गृहमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना सीमावर्ती आणि पायथ्याच्या भागातील असुरक्षित गावांमध्ये सुरक्षा पुरविण्याचे आवाहन केले होते. यापैकी बहुतांश भागात आश्वासन दिल्याप्रमाणे केंद्रीय दलाचे सैन्य तैनात करण्यात आले आहे.
तसेच, आणखी काही भागांत ही प्रक्रिया सुरू असल्याने आम्ही समाधानी आहोत. सर्व संवेदनशील भागांत केंद्रीय दल तैनात झाल्यावर शांतता पुनर्स्थापित करण्यास मदत करण्यासाठी कुकी गटाकडून त्यांचे ‘स्वयंसेवक’ माघार घेतील,’ असे यूपीएफ आणि केएनओ या संघटनेने संयुक्त निवेदनात म्हटले आहे.