शिवसेने नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारले आहे. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे एकूण ४० आमदार असून त्यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. एकनाथ शिंदे यांच्या या निर्णयाचे काही शिवसैनिक समर्थन करत आहेत. तर काही शिवसैनिकांकडून या भूमिकेला विरोध केला जात आहे.
यादरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के हे राजीनामा देणार आहेत. नरेश म्हस्के यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. नरेश म्हस्के यांचा राजीनामा म्हणजे शिवसेनेसाठी धक्का असणार आहे.
नरेश म्हस्के यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “भगवे आमचे रक्त तळपते, तप्त हिंदवी बाणा.. जात, गोत्र अन् धर्म अमुचा शिवसेना, शिवसेना, शिवसेना…! शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच. पण गेली अडीच वर्षे आपल्या संघटनेची “राष्ट्रवादी” गळचेपी चालली आहे. त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे. जय महाराष्ट्र,” असे नरेश म्हस्के यांनी म्हटले आहे.
भगवे आमचे रक्त तळपते,तप्त हिंदवी बाणा..
जात,गोत्र अन् धर्म अमुचा
शिवसेना , शिवसेना ,शिवसेना…!
शिवसैनिक होतो, आहे आणि राहणारच..
पण गेले अडीचवर्षे आपल्या संघटनेची "राष्ट्रवादी" गळचेपी चाललेय त्याचा निषेध म्हणून जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.
जय महाराष्ट्र!@uddhavthackeray— Naresh Mhaske (@nareshmhaske) June 25, 2022
हे ही वाचा:
यूपीच्या बसस्थानकांचे आधुनिकीकरण करण्याच्या तयारीत योगी सरकार
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा ‘त्या’ ट्विटमुळे अडचणीत
महाराष्ट्रात शिवसेना विरुद्ध शिवसेना
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीच्या निर्णयाला ठाण्यासह राज्याच्या इतर भागांमधून समर्थन करण्यात येत आहे. काल, २५ जून रोजी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्यात भाषण केले. यावेळी एकनाथ शिंदेंचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.