पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसाच्या वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी हे त्यांच्या कार्यक्रमासाठी आपल्या गाडीतून निघाले असताना वाराणसीच्या जनतेने त्यांचे भव्य स्वागत केले. जनतेने केलेल्या स्वागताने पंतप्रधान मोदी भारावले.
पंतप्रधान मोदी काशी विश्वनाथाच्या दर्शनासाठी जात असताना वाराणसीतील जनतेने रस्त्याच्या दुतर्फा मोठी गर्दी केली होती. नागरिक पंतप्रधान मोदींच्या वाहनावर पुष्पवृष्टी करत होते. एका व्यक्तीने पंतप्रधान मोदींना पगडी घालण्याचा आग्रह केला. सुरक्षेच्या कारणास्तव मोदींच्या सुरक्षा रक्षकांनी त्या व्यक्तीला रोखले. मात्र, नरेंद्र मोदींनी त्या व्यक्तीला येऊ देण्यास सांगून त्याच्या हस्ते पगडी परिधान केली. त्यानंतर मोदींनी त्या नागरिकाला हात जोडून नमस्कार केला. मोदींचा ताफा ज्या मार्गावरून जाणार होता त्या मार्गावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. हर हर महादेव, बम बम भोले असा जयघोष नागरिकांनी केला.
काशी विश्वनाथ धामच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ८ मार्च २०१९ रोजी या जागेचे भूमिपूजन करण्यात आले होते. सुमारे ३३९ कोटी रुपये खर्च करून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे.