लोकसभा निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला संबोधित करून एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी मागील १० वर्षातील विकास कामांचा उल्लेख केला आहे. तसेच या काळात देशात झालेल्या सकारात्मक बदलांचा उल्लेख करून त्यांनी राष्ट्र उभारणीसाठीचे त्यांचे प्रयत्न खचून न जाता आणि न थांबता सुरूच राहतील, असा विश्वास नागरिकांना दिला आहे. लोकांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता. लोकांसोबतचा त्यांचा प्रवास एक दशक पूर्ण करण्याच्या उंबरठ्यावर असल्याचे निदर्शनास आणून त्यांनी विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यात मदत करण्यासाठी सूचनाही मागितल्या आहेत.
‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ म्हणून नागरिकांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, १४० कोटी भारतीयांचा विश्वास आणि पाठिंबा त्यांना काम करण्याची प्रेरणा देतो. तुमच्या आणि आमच्या एकत्र येण्याला आता एक दशक पूर्ण होत आहे. माझ्या १४० कोटींसोबत विश्वास, सहकार्य आणि पाठिंब्याचे हे मजबूत नाते माझ्यासाठी किती खास आहे हे शब्दात व्यक्त करता कठीण आहे, असं नरेंद्र मोदींनी पत्रात म्हटले आहे.
“माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या आयुष्यात आलेला सकारात्मक बदल ही सर्वात मोठी उपलब्धी आहे, गेल्या १० वर्षातील आमच्या सरकारची सर्वात मोठी संपत्ती आहे. प्रत्येक धोरण, प्रत्येक निर्णयाद्वारे आम्ही राहणीमानात सुधारणा केली आहे. गरीब, शेतकरी, तरुण आणि स्त्रिया यांना सक्षम करण्यासाठी सरकारने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचे अर्थपूर्ण परिणाम आपल्यासमोर आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतून पक्की घरे, सर्वांसाठी वीज, पाणी आणि गॅसची योग्य व्यवस्था, आयुष्मान भारत योजनेतून उपचारांची व्यवस्था, शेतकरी बंधू-भगिनींना आर्थिक मदत, मातृ वंदना योजनेतून माता-भगिनींना केलेली मदत केवळ तुमचा विश्वास माझ्या पाठीशी असल्यामुळेच सार्थकी लागली,” अशा भावना नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
भारत आता परंपरा आणि आधुनिकता या दोन्हींवर लक्ष केंद्रित करून पुढे जात आहे यावर भर देताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, “देशाने पुढील पिढीच्या पायाभूत सुविधांचे अभूतपूर्व बांधकाम आणि आपल्या समृद्ध राष्ट्रीय आणि सांस्कृतिक वारशाचे पुनरुज्जीवन दोन्ही पाहिले आहे.”
हे ही वाचा..
षटक संपल्यानंतर ६० सेकंदांच्या आत पुढील षटकाला सुरुवात न केल्यास बसणार दंड
लष्कराचे गणवेश विकून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या संशयिताला अटक
“बाल स्वरूपातील मूर्ती साकारताना प्रभू रामचंद्रांनी खूप परीक्षा घेतली”
दिल्लीत रस्त्यावरच्या नमाजाला घातला पायबंद!
“जीएसटीची अमलबजावणी, कलम ३७० हटवणे, तिहेरी तलाकवर नवीन कायदा करणे, महिलांसाठी नारी शक्ती वंदन विधेयक आणणे असे मोठे निर्णय घेणे हे नागरिकांच्या पाठींब्यामुळे आणि विश्वासामुळेच शक्य झाले,” असे नरेंद्र मोदी म्हणाले. दरम्यान, तिसऱ्या टर्मसाठी लोकांकडून पाठिंबा आणि सहकार्य मागितले आहे. या लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ४०० हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. सरकारचा विकास अजेंडा आणि २०४७ पर्यंत विकसित भारताचे आश्वासन हे भाजपचे मुख्य निवडणुकीचे उद्दिष्ट आहे.