पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज, १४ जून रोजी देहूत येणार आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यानंतर माळवाडी येथे त्यांची सभा होईल. दुपारी १.३५ ते ३.०५ यावेळेत ते देहूमध्ये असणार आहेत. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे.
देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत २२ एकरच्या मैदानात सभा होणार आहे. त्यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच या ठिकाणापासून जवळच तीन हेलिपॅड उभारले आहेत. दुपारी एकच्या सुमारास पंतप्रधानांचे आगमन होईल. चारशे वारकरी टाळ-मृदंगांच्या गजरात पंतप्रधानांचे स्वागत करणार आहेत. शिळा मंदिर लोकार्पण सोहळ्यानंतर मोदी माळवाडीच्या सभामंडपाकडे जातील.
या दौऱ्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला असून शहराला छावणीचे स्वरूप आले आहे. देहू संस्थानने मार्च महिन्यात नरेंद्र मोदींना दिल्लीत जाऊन आमंत्रण दिलं होतं. इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान श्रीक्षेत्र देहू येथे येणार आहेत.
तसेच पंतप्रधान मोदी हे मंगळवारी मुंबईत दोन कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. देहू येथील कार्यक्रम पार पडल्यावर पंतप्रधान मुंबईत दाखल होतील. दुपारी त्यांच्या हस्ते राजभवनमध्ये ‘जल भूषण’ या नव्याने उभारण्यात आलेल्या राज्यपालांच्या निवासस्थानाची इमारत आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या दालनाचे उदघाटन होणार आहे. त्यानंतर ‘मुंबई समाचार’ या गुजराती दैनिकाला २०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या समारंभाला मोदी हे उपस्थित राहतील.
हे ही वाचा:
आज राहुल गांधींची पुन्हा ईडी चौकशी
क्रांतिसूर्य बिरसा मुंडा पुण्यतिथीनिमित्त मोखाड्यात कार्यक्रम
“राहुलजींनी गांधीच राहावं, सावरकर होण्याच्या भानगडीत पडू नये”
परदेशात बँक खाते आहे का, किती रक्कम आहे? ईडीने राहुलना विचारले!
नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा आपल्या हस्ते पार पडणार असल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजत आहे. संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं,” असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
I feel blessed to be getting the opportunity to inaugurate the Jagatguru Shrisant Tukaram Maharaj Temple in Dehu. We are all inspired by the divine teachings of Sant Tukaram Ji, particularly the emphasis on serving society and empowering the downtrodden.
— Narendra Modi (@narendramodi) June 13, 2022