दिवंगत ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या पत्राबद्दल काय म्हणाले मोदी?

दिवंगत ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्या पत्राबद्दल काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज या वर्षाचा शेवटचा ‘मन की बात’ कार्यक्रम केला. नरेंद्र मोदी यांनी सुरुवातीलाच ओमिक्रोन विषाणूमुळे येणाऱ्या संभाव्य धोक्याची जाणीव नागरिकांना करून दिली. आपली सामुहिक शक्ती या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा पराभव करेल आणि याच जबाबदारीच्या जाणीवेसह आपल्याला २०२२मध्ये प्रवेश करायचा आहे, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडूमध्ये झालेल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या अधिकाऱ्यांना वंदन केले. या भीषण अपघातातून ग्रुप कॅप्टन वरुण सिंह हे एकमेव अधिकारी बचावले होते. वरुण सिंह यांनी देखील मृत्यूशी अनेक दिवस धैर्याने झुंज दिली. मात्र, नंतर तेही आपल्याला सोडून निघून गेले, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

वरुण सिंह जेव्हा रुग्णालयात होते, त्यावेळी मी समाज माध्यमांवरून त्यांनी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहिलेले एक पत्र दृष्टीस पडल्याचे नरेंद्र मोदी म्हणाले. या वर्षी, ऑगस्ट महिन्यातच त्यांना शौर्य चक्र देण्यात आले होते. हा सन्मान मिळाल्यानंतर त्यांनी त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना एक पत्र लिहिले होते. म्हणजे जेव्हा त्यांनी आनंद साजरा करायला हवा होता तेव्हा त्यांना आपल्या येणाऱ्या पिढ्यांची चिंता होती. वरुण सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात स्वतःच्या पराक्रमाचे वर्णन केलेले नही, तर स्वतःच्या अपयशांविषयी ते बोलले आहेत.

या पत्रात वरुण त्यांनी लिहिले आहे की, “एक सामान्य व्यक्ती असण्यात काहीही गैर नाही. प्रत्येक व्यक्ती शाळेत सर्वोत्तम कामगिरी करु शकत नाही आणि प्रत्येक विद्यार्थी ९० टक्के गुण मिळवूही शकत नाही. जर आपण हे करु शकलो, तर ती विलक्षण कामगिरी असेल आणि त्याचे कौतूक केलंच पाहिजे. मात्र, जर आपण ते करु शकलो नाही, तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयुष्यभर सर्वसामान्य व्यक्तीच राहणार आहात. कदाचित शाळेत तुम्ही एक सामान्य विद्यार्थी असाल, मात्र त्यावरून तुमच्या पुढच्या आयुष्याचे कुठल्याही अर्थाने मोजमाप केले जाऊ शकत नाही. आयुष्यात जे काही काम तुम्ही कराल, त्यात संपूर्ण समर्पण द्या. तुमचे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. कधीही नकारात्मक विचार करु नका, की मी आणखी प्रयत्न करु शकलो असतो.”

हे ही वाचा:

बिहारच्या मुझफ्फरपूरमध्ये बॉयलरच्या स्फोटात १० ठार

गेले सांता कुणीकडे?

सलमान खानला साप चावला

हार्बर मार्गावर एसी लोकलच्या काचा फोडल्या

वरुण सिंह यांनी लिहिले होते की, ते या पत्राच्या माध्यमातून किमान एका जरी विद्यार्थ्याला प्रेरणा देऊ शकले, तरी ते खूप असेल. मात्र, या पत्रातून त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.  त्यांनी या पत्रातून संपूर्ण समाजाला आणि देशाला संदेश दिल्याचे मोदी म्हणाले.

Exit mobile version