महाराष्ट्रातील युती उद्धव ठाकरेंनी तोडली, भाजपाने नाही, अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए खासदारांच्या झालेल्या बैठकीत केली. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात मंगळवार, ८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी एनडीएच्या खासदारांची बैठक पार पडली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. अजित पवार गटाचे खासदारही बैठकीसाठी हजर होते. या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अर्जुन मेघवाल आणि जे पी नड्डा हे देखील उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले की, “शिवसेना भाजपासोबत सत्तेत होती त्यावेळी ‘सामना’ वृत्तपत्रात माझ्यावर टीका केली जायची. त्यामुळे वाद निर्माण होत असे. अनेक वेळा सहन केले. तुम्हाला सत्तेत पण राहायचे आहे आणि तुम्हाला आमच्यावर टीका पण करायची आहे या दोन गोष्टी एकत्र कशा चालतील? बिहारमध्ये कमी संख्या असतानाही नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपद दिलं. एकनाथ शिंदे आले आणि त्यांना मुख्यमंत्रीपद दिले. आमचे मित्र आमच्यासाठी महत्वाचे आहेत. सर्वांचा आदर केला जाईल. भाजपा ही काँग्रेससारखा अहंकारी नाही, त्यामुळे भाजपा सत्तेतून जाणार नाही,” असे म्हणत नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी इतर विरोधकांवरही निशाणा साधला. काँग्रेसच्या स्वार्थामुळे प्रणव मुखर्जी, शरद पवार यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना पंतप्रधान पदाची संधी मिळाली नाही. काँग्रेसने वैयक्तिक स्वार्थासाठी अनेक नेत्यांचे खच्चीकरण केले, असे म्हणत एनडीए बैठकीत पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला.
हे ही वाचा:
अविश्वास ठरावासाठी बीजेडीचा मोदी यांना पाठिंबा का?
चीनच्या पे-रोलवर पोसलेले पत्रकार किती?
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील १२ रेल्वे स्थानके चमकणार
मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई हेल्पलाईन सुवर्ण पदकाची मानकरी!
नरेंद्र मोदींनी राजस्थानच्या खासदारांना संबोधित करताना सांगितले की, राजस्थानमधील कोणत्याही सरकारची स्थिती आता इतकी वाईट नाही. भारताच्या विकासासाठी राजस्थानची निवडणूक जिंकणे आवश्यक आहे. राजस्थानची निवडणूक जिंकणे महत्त्वाचे आहे. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असून घराणेशाहीच्या राजकारणाच्या विरोधात असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केले.