तृणमूल काँग्रेसचे सरकार असलेल्या पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांवरील अत्याचाराचे गंभीर प्रकरण देशभरात गाजले होते. त्यानंतर पीडित महिलांनी एका तृणमूल काँग्रेस नेत्याच्या विरोधात आवाज उठवला होता. भाजपाने तृणमूल काँग्रेसच्या नेत्यावर कारवाई करण्यासाठी अनेक मोर्चे काढले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली होती. अशातच नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा संदेशखाली प्रकरणावर भाष्य केलं आहे.
पश्चिम बंगालमधील संदेशखाली येथे महिलांचा लैंगिक छळ आणि जमीन बळकावल्याचा आरोप असलेला टीएमसी नेता शेख शाहजहान याला बंगाल पोलिसांनी २९ फेब्रुवारी रोजी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला सीबीआयच्या ताब्यात दिले. त्यानंतर पश्चिम बंगालच्या कूचबिहार येथे गुरुवार, ४ एप्रिल रोजी पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी ते म्हणाले की, “संपूर्ण बंगाल आणि देशाने पाहिलं आहे की, संदेशखाली प्रकरणातील आरोपींना वाचवण्यासाठी तृणमूलने त्यांची ताकद पणाला लावली होती. संदेशखालीतल्या महिलांबरोबर जे काही झालं तो तृणमूलच्या अत्याचारांचा कळस होता. भाजपाने ठरवलं आहे की, संदेशखालीच्या गुन्हेगारांना शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढावं लागेल.”
हे ही वाचा:
अर्थशास्त्रज्ञांना जमलं नाही ते चहा विकणाऱ्याचा मुलगा पंतप्रधान झाल्यावर करून दाखवलं!
काँग्रेसचा ‘हात’ सोडणाऱ्या गौरव वल्लभ यांचा भाजपात प्रवेश
सिद्धू मुसेवालाचे वडील लोकसभा निवडणूक लढविण्याच्या तयारीत!
मोईत्रा यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँडरिंगचा गुन्हा
दरम्यान, संदेशखाली प्रकरणी कोलकाता उच्च न्यायालयानेही गुरुवारी बंगाल सरकारला फटकारले आहे. न्यायालय म्हणाले की, “या प्रकरणात एक टक्काही सत्यता असेल तर ते लज्जास्पद आहे. याला संपूर्ण प्रशासन आणि सत्ताधारी १०० टक्के नैतिकदृष्ट्या जबाबदार आहेत. हा लोकांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे.” संदेशखालीमध्ये शेख शाहजहान आणि त्याचे दोन सहकारी शिबू हाजरा आणि उत्तम सरदार यांच्यावर महिलांवर दीर्घकाळ सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी शिबू हाजरा, उत्तम सरदार, शाहजहान यांच्यासह १८ जणांना अटक केली आहे.