देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली असून गुरुवार, १ फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवार, ३१ जानेवारी रोजी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, हे पर्व नारीशक्तीच्या साक्षात्काराचं पर्व आहे. त्यांनी नारीशक्तीचा गौरव देखील केला. अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडतील, असंही ते म्हणाले.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल देखील केला. गोंधळ घालणं हा काही लोकांचा स्वभाव असतो. अधिवेशनावेळी गोंधळ घालणाऱ्यांना पश्चातापाची ही संधी आहे, गोंधळ घालणाऱ्यांनी एकदा आत्मपरिक्षण करावं असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला आहे. विरोधकांनी मागच्या दहा वर्षांमधून धडा घ्यावा आणि आता तरी हलकल्लोळ आणि गोंधळ घालू नये, असा सल्ला नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिला आहे.
भाषणाला सुरुवात करताना पंतप्रधान मोदी यांनी राम राम म्हणत सुरुवात केली. २०२४ सालासाठी तुम्हा सर्वांना राम-राम, असं ते सर्वांना म्हणाले.
“संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होतं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं मार्गदर्शन लाभणार आहेत. तसंच गुरुवारी निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प पटलावर ठेवतील. नारीशक्तीच्या साक्षात्काराचं हे पर्व आहे. आशा करतो की, मागच्या दहा वर्षात ज्यांना ज्या मार्गाने जायचं होतं त्या मार्गाने संसदेत प्रत्येकाने कार्य केलं. ज्यांना दंगा घालण्याची सवयच झाली आहे, जे धुडगूस घालून लोकशाही मूल्यांचं वस्त्रहरण करतात अशा खासदारांनी शेवटच्या सत्रात आत्मपरिक्षण करावं,” अशी खोचक टीका नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर केली आहे.
हे ही वाचा:
तामिळनाडू सरकारने २२ जानेवारीला फक्त चार धार्मिक कार्यक्रमांना दिली परवानगी!
छत्तीसगड: नक्षलवाद्यांचा सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला, ३ जवान हुतात्मा १४ जखमी!
शिवसेना आमदार अनिल बाबर यांचे निधन
महाविकास आघाडीत ‘वंचित’चा समावेश!
निवडणूक जवळ आली असेल तर पूर्ण बजेट सादर होत नाही. फक्त अंतरिम बजेट सादर केलं जातं. आम्हीही ती परंपरा कायम ठेवू असंही मोदी यांनी म्हटलं आहे. आपल्या देशाच्या प्रगतीचा आलेख उंचावतो आहे. जनतेच्या आशीर्वादाने तो आणखी उंचावेल असा विश्वास आहे, असंही नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.