पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवार, २२ जुलै रोजी पत्रकारांना संबोधित करताना सर्व संसद सदस्यांना पक्षीय राजकारणाला बाजूला सारत एकत्र येऊन देशाच्या भविष्यासाठी काम करण्याचे आवाहन केले. पंतप्रधान मोदी यांनी नकारात्मक राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांना भूतकाळातील कटुता दूर करून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, “मी सर्व संसद सदस्यांना विनंती करतो की, त्यांनी कितीही वैचारिक विरोध केला तरी सभागृहातील सर्व चर्चेत सहभागी व्हावे. विरोधी विचारसरणी वाईट नसतात, तर नकारात्मक विचारसरणी ही वाईट असते आणि तेव्हाच विचारांची क्षमता संपते. देशाला नकारात्मकतेची गरज नाही. देशाला प्रगतीशील विचारसरणीची गरज आहे जी विकासाला चालना देईल आणि देशाला उच्च उंचीवर नेईल,” असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
भाजपाच्या नेतृत्वातील एनडीए सरकार तिसऱ्यांदा पुन्हा सत्तेत आल्यानंतर झालेल्या पहिल्या अधिवेशनात विरोधकांनी सभागृहाचे कामकाज सुरळीत होऊ दिले नव्हते. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना सुनावाले. नरेंद्र मोदी म्हणाले की, “नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात विरोधकांनी देशातील १४० कोटी जनतेने लोकशाही मार्गाने निवडून दिलेल्या सरकारचा आवाज दाबला. अडीच तास त्यांनी पंतप्रधानांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला. देशाच्या लोकशाही तत्त्वांमध्ये याला स्थान नाही, त्यांना याचा पश्चातापही होत नाही,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
“सर्वांना सांगू इच्छितो की, लोकांनी आम्हाला आमच्या पक्षांसाठी नाही तर देशासाठी येथे पाठवले आहे. ही संसद १४० कोटी लोकांसाठी आहे. मला आशा आहे की आम्ही भारतातील सामान्य नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी लोकशाहीच्या मंदिराचा सकारात्मक वापर होईल,” अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी त्यांनी सर्व खासदारांना सल्ला देताना म्हटलं की, “खासदार कुठल्याही पक्षाचे का असेनात, त्यांना आग्रहाने सांगू इच्छितो की, जानेवारीपासून आपल्याकडे जितकं सामर्थ्य होतं. ते सामर्थ्य घेऊन, जितकी लढाई लढायची होती तेवढे लढलो. जनतेला जे सांगयाच होतं ते सांगितलं. कोणी मार्ग दाखवला, कोणी दिशाभूल केली. पण तो टप्पा संपलाय. देशाने निर्णय दिला आहे. आता निवडून आलेल्या सर्व खासदारांचे कर्तव्य आहे. सर्व पक्षांची जबाबदारी आहे, आपल्याला पक्षासाठी जितकं लढायच होतं, तेवढे लढलो, आता येणाऱ्या पाच वर्षांसाठी आपल्याला देशासाठी लढायचं आहे,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
“यंदाचा अर्थसंकल्प २०४७ सालच्या विकसित भारताचा पाया रचणारा असेल”
एनसीईआरटीच्या पुस्तकात आता ‘हडप्पा संस्कृती’चा उल्लेख ‘सिंधू सरस्वती संस्कृती’
जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करी चौकीवर दहशतवाद्यांचा हल्ला; जवानांकडून चोख प्रत्युत्तर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांची निवडणुकीतून माघार
“सर्व राजकीय पक्षांनी येणारी चार-साडे चारवर्ष पक्षाच्या पुढे जाऊन देशाला समर्पित होऊन संसदेचा उपयोग करुया. २०२९ निवडणूक वर्ष असेल, तेव्हा तुम्ही मैदानात जा. जो खेळ खेळायचाय तो खेळा. पण तो पर्यंत फक्त देशातील गरीब, शेतकरी, युवा, महिला त्यांच्या समार्थ्यासाठी, त्यांना सबळ करण्यासाठी काम करु. २०४७ चे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी पूर्ण ताकद लावू,” असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
यापूर्वी अनेक खासदारांना आपल्या क्षेत्राबाबत बोलता आलं नाही. कारण काही पक्ष नकारात्मक राजकारण करत होते. देशाच्या खासदारांचा अमूल्य वेळ काही पक्षांनी अपयश झाकण्यााठी खर्च केला. पण, आता आवाहन आहे की, जे पहिल्यांदा निवडून आले आहेत त्यांना बोलण्याची संधी द्या, त्यांचे विचार ऐका. खासदारांना पुढे येऊन बोलण्याची संधी द्या.