काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी खोटे बोलण्याचे दुकान महाराष्ट्रात लावलंय

नाशिकमधील सभेतून नरेंद्र मोदींचा विरोधकांवर प्रहार

काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी खोटे बोलण्याचे दुकान महाराष्ट्रात लावलंय

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारसभांना वेग आला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नाशिकमध्ये सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागत खरपूस समाचार घेतला आहे. संपूर्ण देशानं काँग्रेसला नाकारलं असून ती ऑल इंडिया नाही तर परजीवी आहे. बिहार, झारखंड अशा राज्यात दुसऱ्यासोबतच निवडणुका लढत आहे. एससी, एसटी ओबीसींची एकता तोडा आणि राज्य मिळवा हे त्यांचे धोरण आहे, अशी तिखट टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.

नरेंद्र मोदी म्हणाले की, आपण जनतेसमोर आपली कामं दाखवत निवडणुकीत जात असतो मात्र काँग्रेसकडे आता एकच पर्याय आहे. काँग्रेसकडे खोटं बोलण्याचे दुकान आहे. सध्या काँग्रेस आणि त्यांच्या चेल्यांनी हे दुकान महाराष्ट्रात लावले आहे. कर्नाटक, हिमाचलमध्ये हेच केलं आणि निवडणुका संपल्या तेव्हा दुकान बंद झालं. सरकार चालवण्यासाठी यांच्याकडे पैसे नाहीत. जनतेवर कर लादला जातोय. जनता यांची खरी खोटी जाणते, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

“काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाची पर्वा आहे, ना न्यायालयाची, ना देशाच्या भावनेची पर्वा आहे. ते फक्त दिखाव्यासाठी खिशात रिकाम्या पानांचे संविधान घेऊन फिरतात,” असा उपरोधिक टोला नरेंद्र मोदींनी लगावला आहे. देशात ७५ वर्षांपर्यंत देशात एक संविधान नव्हतं. जम्मू- काश्मीरचं संविधान वेगळं होतं. ते बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नसून ते पाप काँग्रेसचे होते. काँग्रेसने कलम ३७० सारखी भिंत उभी केली होती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान तिथे जाऊच शकत नव्हते,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

कलम ३७० हटवल्यानंतर आपल्याला आनंद झाला पण काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पोटात दुखायला लागलं. दोन-तीन दिवसाआधी जम्मू- काश्मीरच्या विधानसभेत काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जम्मू- काश्मीरमध्ये पुन्हा कलम ३७० लागू करण्यासाठी हंगामा केला. या लोकांना पुन्हा बाबासाहेबांचे संविधान जम्मू- काश्मीरमधून काढायचं आहे, असंही नरेंद्र मोदी म्हणाले.

हे ही वाचा : 

पुतीन म्हणतात, जागतिक महासत्तांच्या यादीत सामील होण्यास भारत पात्र

मविआचे लोक शिव्या देण्यावर उतरलेत, महिलांनो सतर्क राहा

मविआच्या गाडीला ना चाके, ना ब्रेक तरीही चालकाच्या सीटवर बसण्यासाठी भांडणे सुरू

तेलंगणात माता पोचम्मा मुर्तीची तोडफोड

नरेंद्र मोदी म्हणाले की, “दिलेली आश्वासने पूर्ण करणं तर दूर काँग्रेसशासित राज्यात सरकार चलवण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. खर्चासाठी जनतेचे टॅक्स वाढवले जात आहेत. जनतेकडून वसुली होत आहे. एकीकडे महायुतीचे घोषणापत्र तर, दुसरीकडे आघाडीचे घोटाळापत्र. कारण जिथे काँग्रेस आणि त्यांचे सहकारी असतील तिथे घोटाळा होणार म्हणजे होणार,” असा दावा नरेंद्र मोदी यांनी केला.

Exit mobile version