संसदीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला शुक्रवारपासून सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेल्या अभिभाषणावर काँग्रेस नेत्यांनी केलेल्या टिपण्णीवरून राजकारण पेटले आहे. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावर भाष्य करताना ‘गरीब बाई, खूप थकलेल्या दिसत होत्या’ अशा आशयाचे वक्तव्य केले. तर, राहुल गांधी यांनी त्यांचे भाषण कंटाळवाणे असल्याचे म्हटले आहे. यावरून आता काँग्रेस अडचणीत सापडली असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली जात आहे. तसेच सोनिया गांधींच्या वक्तव्यामुळे राष्ट्रपती भवनाच्या प्रतिष्ठेला तडा गेला असून यामुळे शिष्टाचाराचे उल्लंघन झाल्याचे राष्ट्रपती भवनाने म्हटले आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संताप व्यक्त करत काँग्रेसला खडेबोल सुनावले आहेत.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरुन सत्ताधारी आणि विरोधक राजकीय मंचावर आमनेसामने आले आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर भाष्य करताना सोनिया गांधी यांनी द्रौपदी मुर्मू यांना ‘पुअर लेडी’ म्हटले. यावरुन पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना जबरदस्त सुनावले आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या ओडिशामधील एका गरीब आदिवासी कुटुंबातून या पदापर्यंत पोहोचल्या आहेत. त्यांची मातृभाषा हिंदी नाही त्या उडिया भाषेत लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत. हिंदी ही मातृभाषा नसूनही त्यांनी आज संसदेत उत्कृष्ट भाषण केले आणि लोकांना प्रेरित केले. पण काँग्रेसचे राजघराणे त्यांचा अपमान करण्यासाठी आले आहे. राजघराण्यातील एका सदस्याने (राहुल गांधी) म्हटले की, आदिवासी महिलेने (राष्ट्रपती) कंटाळवाणे भाषण केले. काँग्रेसच्या आणखी एक सदस्या (सोनिया गांधी) आहेत त्या तर त्याहून आणखी पुढे गेल्या. त्यांनी राष्ट्रपतींना ‘पुअर थिंग’ म्हटलं. गरीब आणि वस्तू असा त्यांचा उल्लेख केला. थकलेल्या आहेत, असंही वक्तव्य केलं. एका आदिवासी महिलेचे बोलणे काँग्रेसला कंटाळवाणे वाटते. हा देशातील १० कोटी आदिवासी बांधवांचा अपमान आहे,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर केली आहे.
हे ही वाचा:
दाऊद टोळीचा गुंड प्रकाश हिंगु तब्बल २९ वर्षांनी सापडला!
‘आप’ भ्रष्टाचारी है… म्हणत आम आदमीच्या आमदाराचा राजीनामा
देशाची अर्थव्यवस्था ६.३ ते ६.८ टक्के दराने वाढणार
सैफ हल्ला प्रकरणात अटकेतील आरोपी आणि सीसीटीव्हीमधील व्यक्ती एकचं!
“काँग्रेसच्या राजघराण्याला तळागाळातून वर आलेले लोक अजिबात आवडत नाहीत. गरीब, दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजातील लोकही पुढे जातात तेव्हा प्रत्येक पावलावर त्यांचा अपमान काँग्रेसकडून केला जातो. आर्थिक प्रगती, शेतकऱ्यांची समृद्धी, मेट्रो, रस्ते, खेळाडूंचे गुणगान याचा भाषणात उल्लेख केला जातो तर या लोकांना ते ही कंटाळवाणे वाटते. त्यांना या लोकांना शिव्या देणे, विदेशात भारताची बदनामी करणे आणि शहरी नक्षलवाद्यांबद्दल बोलणे आवडते,” अशी तिखट टीका नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधताना केली.