पंतप्रधानांनी टोचले राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे कान
देशात पुन्हा एकदा कोरोना संकटाचे ढग गडद होत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, १७ एप्रिल रोजी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात पुन्हा एकदा कोरोना संकट वाढत असल्याचे सर्व राज्यांच्या निदर्शनास आणून दिले. तसेच इंधन दारावरूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही राज्यांना सुनावले आहे.
कोरोना संकट काळात सर्व राज्यांनी, अधिकाऱ्यांनी आणि फ्रंट लाईन कर्मचाऱ्यांनी केंद्र सरकारच्या बरोबर ज्या प्रकारे काम केलं त्याचे नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले. पण अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे टळलेलं नाही. काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे आपल्याला अलर्टवर राहण्याची गरज असल्याचे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. रुग्णालयातील सुविधा सुस्थितीत असायला हव्यात. संकट काळात तयार ठेवायला हव्यात. कोरोना काळात अनेक रुग्णालयांना आग लागल्याच्या घटना घडल्या होत्या. सध्या देशात उष्णता वाढत आहे. आग लागण्याच्या घटना घडत आहेत त्यामुळे वेळीच रूग्णालायांचे ऑडिट व्हायला हवे, असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
भारताची अर्थव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्यातील सरकार यांच्यात आर्थिक निर्णयात ताळमेळ असायला हवा. सध्याच्या युद्ध परिस्थितीत समतोल बिघडला आहे, संकट येत आहेत अशा वेळी केंद्र आणि राज्य सरकारमध्ये ताळमेळ असायला हवा.
हे ही वाचा:
रथ ओढताना विजेचा धक्का लागून ११ भाविकांचा मृत्यू
एबीजी शिपयार्ड कंपनीच्या २६ कार्यालयांवर ईडीने टाकल्या धाडी
वकील गुणरत्न सदावर्तेंना जामिन! अटकेपासूनही संरक्षण
हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा
केंद्र सरकारने नागरिकांच्या सोयीसाठी त्यांचा आर्थिक ताण कमी व्हावा म्हणून पेट्रोल डीझेलवरची एक्साइज ड्युटी मागच्या नोव्हेंबर महिन्यात कमी केली होती. सर्व राज्य सरकारलाही आग्रह केला होता की, राज्यांनी कर कमी करा आणि नागरिकांवरचा बोजा कमी करा. त्यानंतर काही राज्यांनी कर कमी केला तर काही राज्यांनी केला नाही त्यामुळे आजही या राज्यांमध्ये पेट्रोल डीझेलचे दर इतर राज्यांच्या तुलनेत जास्त आहेत. राज्यांनी हे कर कमी न केल्यामुळे राज्यातील नागरीकांचे नुकसान होत आहे. महाराष्ट्र, केरळ, तेलंगणा, पश्चिम बंगाल, आंध्रप्रदेश अशा काही राज्यांनी कर कमी केला नाही, असे नरेंद्र मोदी म्हणाले. मुंबईपेक्षा दीव दमनमध्ये पेट्रोल दर कमी आहे. अजूनही वेळ गेलेली नाही त्यामुळे या राज्यांनी देशहितासाठी कर कमी करावा. आपल्याला टीम म्हणून काम करायचे आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले. तसेच त्यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना काही सल्ले, उपाय सुचवायचे असल्यास त्यांनी द्यावेत असं सांगितले आहे.