जम्मू-काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही रुजवण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील

जम्मू-काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही रुजवण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील

जम्मू आणि काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही रुजवण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीनंतर मोदींनी आपले मत मांडले आहे. ट्विटरवर या बैठकीचे फोटो पोस्ट करत मोदींनी या बैठकीबद्दलचे आपले विचार व्यक्त केले.

गुरुवारी भारत सरकार आणि जम्मू-काश्मीरमधील सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एक महत्वाची बैठक पार पडली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली असून या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह हे उपस्थित होते. तर जम्मू-काश्मीरचे नायाब राज्यपाल मनोज सिन्हा यांनीदेखील या बैठकीला उपस्थिती दर्शवली. या बैठकीत जम्मू आणि काश्मीर संबंधित अनेक महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली असून पंतप्रधान मोदींनी या बैठकीविषयी समाधान व्यक्त केले आहे.

नरेंद्र मोदी आपल्या ट्विट्समध्ये म्हणतात, “जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय नेत्यांबरोबरची आजची बैठक म्हणजे विकसित आणि प्रगतीशील जम्मू आणि काश्मीरच्या दिशेने सध्या सुरु असलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल आहे. अशा प्रगतीशील जम्मू-काश्मीरमध्ये सर्वांगीण प्रगतीचा आलेख पुढे नेता येईल.”

तर पुढे ते म्हणतात, “जम्मू – काश्मीरमध्ये तळागाळापर्यंत लोकशाही रुजवणे आणि ती बळकट करणे याला आम्ही सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. या क्षेत्रातील मतदारसंघांची पुनर्रचना जलदगतीने झाली पाहिजे, जेणेकरून निवडणुका घेता येतील आणि विकासाला बळकटी देणारे एक लोकनियुक्त सरकार जम्मू आणि काश्मीरला मिळेल.”

आपल्या लोकशाहीची सर्वात मोठी ताकद म्हणजे चर्चेला बसून आपली मते मांडणे. जम्मू काश्मीरला जनतेने आणि त्यातही विशेषतः तरुणाईने राजकीय नेतृत्व दिले पाहिजे आणि जनतेच्या आशा-आकांक्षांची पूर्तता होण्याची काळजी घेतली पाहिजे असेही मोदींनी जम्मू-काश्मीरमधील नेत्यांना सांगितले.

Exit mobile version