एनडीएच्या संसदीय दलाची बैठक संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली असून या बैठकीत सर्व एनडीएच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांची संसदीय दलाचे नेते म्हणून निवड केली. संसदेमध्ये मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला एनडीएतील सर्व नेत्यांनी अनुमोदन दिले आहे. तेलुगु देसम पार्टीच्या चंद्राबाबू नायडू यांनी देखील नरेंद्र मोदींच्या नावाच्या प्रस्तावाला अनुमोदन दिले आहे. एनडीए आघाडीत चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते. अशातच चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदी यांच्या स्तुतिसुमने उधळत त्यांना पाठींबा दिला आहे.
“मी चार दशकं राजकारणात असून अनेक सरकारं पाहिली आहेत. पण, नरेंद्र मोदींकडे ध्येय आहे आणि ते पूर्ण करण्याची त्यांच्यात ताकद आहे. योग्य वेळेला योग्य नेता आपल्याला मिळाला आहे. मोदींच्या नेतृत्त्वात भारताने सर्वाधिक आर्थिक वाढ पाहिली आहे. मी अभिमानाने सांगतो की आमचा मोदींना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ या त्यांच्या घोषणेशी आम्ही सहमत आहोत,” असा विश्वास चंद्राबाबू नायडू यांनी व्यक्त केला आहे.
“नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात आपण पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झालो आहोत. येत्या काळात त्यांच्या नेतृत्त्वात आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होऊ. विकसित भारताचे त्यांनी स्वप्न पाहिले आहे. हे मोदींच्या नेतृत्त्वात होणार आहे,” असंही चंद्राबाबू म्हणाले.
हे ही वाचा:
पाकिस्तानविरोधातील अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार; सौरभ नेत्रावलकर आहे तरी कोण?
टी२० विश्वचषक स्पर्धेत अमेरिकेकडून पाकिस्तानला पराभवाचा धक्का!
सलग आठव्यांदा आरबीआयचा रेपो रेट जैसे थे स्थितीत
नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्याला सफाई कर्मचारी, मजूर, केंद्रीय योजनांचे लाभार्थी उपस्थित राहणार
“गेल्या तीन महिन्यांपासून नरेंद्र मोदींनी विश्रांती घेतली नाही. दिवसरात्र ते काम करत आहेत. त्यांची उर्जा थोडी देखील कमी झाली नाही. त्यांच्या सभेमुळे आम्हाला राज्यात जिंकण्यासाठी मोठी मदत झाली. त्यांच्यामुळेच राज्यातील लोकांमध्ये सकारात्मकता निर्माण झाली,” असे गौरवोद्गार काढत चंद्राबाबू नायडू यांनी नरेंद्र मोदींना आणि एनडीएला पाठींबा दिला आहे.