रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये युद्ध भडकल्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर घडामोडींना सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात चर्चा झाली. गुरुवारी, २४ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पुतीन आणि नरेंद्र मोदी यांच्यात फोनवर चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात जवळपास २५ मिनिटे चर्चा झाली. युक्रेनमध्ये शांतता प्रस्थापित व्हावी, यासाठी नरेंद्र मोदींनी आवाहन केले. ही चर्चा सकारात्मक राहिली. युद्धाने कोणतेही प्रश्न सुटू शकत नाहीत, त्यामुळे युक्रेनमधील हिंसाचार तत्काळ थांबला पाहिजे आणि तिथे शांतता प्रस्थापित व्हायला हवी, असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी या चर्चेदरम्यान पुतीन यांना केल्याची माहिती समोर आली आहे.
रशियाचा नाटो देशांशी वाद असेल तर त्यावर युद्ध हा पर्याय असू शकत नाही. चर्चेतून हा वाद मिटवला पाहिजे, असे मोदी यांनी पुतीन यांना सांगितले. युक्रेनमध्ये भारतीय नागरिक व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकले आहेत. त्यांना तिथून सुरक्षितपणे मायदेशी आणण्याचे आव्हान आहे. यावर मोदी यांनी पुतीन यांच्याशी विस्ताराने चर्चा केली. त्याला पुतीन यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. भारत आणि रशिया या दोन देशांमध्ये मैत्रीचे संबंध राहिले आहेत. त्याआधारावर दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा अत्यंत महत्त्वाची ठरली.
हे ही वाचा:
मनपा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी धडकले आयकर खाते
मध्य प्रदेशमध्ये ११ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी
सपत्निक पूजा करताना हे असतात नियम
दरम्यान, पुतीन यांच्याशी चर्चा करण्याआधी पंतप्रधान मोदी यांनी गुरुवारी सायंकाळी युक्रेन संकटावर एक महत्त्वाची बैठक घेतली होती. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासह सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते. युक्रेनमधील स्थितीचा आढावा घेऊन तिथे अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे कसे बाहेर काढायचे, याबाबत बैठकीत विचारविनिमय करण्यात आला. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पोलंड आणि हंगेरीमार्गे माघारी आणण्याची योजना असल्याचेही सांगण्यात आले. युक्रेनचे हवाईक्षेत्र बंद असल्याने या पर्यायाचा विचार करण्यात आला आहे.