राष्ट्रीय स्तरावरचा पक्ष म्हणून ओळख मिळवणाऱ्या भारतीय जनता पार्टीचा (भाजपा) आज, ६ एप्रिल रोजी ४२ वा स्थापना दिवस आहे. भाजपाचा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात देशभरात आज साजरा केला जात आहे. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि पक्षाच्या कार्याबद्दल त्यांनी माहिती दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतमातेला वंदन करत आपल्या भाषणाची सुरूवात केली आणि त्यांनी कार्यकर्त्यांना स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नरेंद्र मोदी म्हणाले की, आज देशाकडे धोरणंही आहेत आणि इच्छाशक्तीसुद्धा आहे. कार्यकर्त्यांशी बोलताना पंतप्रधान मोदी यांनी विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला. पंतप्रधान मोदी म्हणाले, “जेव्हा सरकारी योजनांचा लाभ प्रत्येक क्षेत्रापर्यंत पोहोचेल तेव्हा देशात ‘सबका साथ-सबका विकास’ होईल. देशात अनेक दशके काही पक्षांनी व्होटबँकेचे राजकारण केले. भेदभाव, भ्रष्टाचार हे व्होटबँकेच्या राजकारणाचे दुष्परिणाम आहेत,” अशी टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा घराणेशाहीच्या मुद्द्यावरून काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. अनेक दशकांपासून काही लोकांनी मतांचे राजकारण केलं. मूठभर लोकांना आश्वासन द्यायचे आणि इतरांना ताटकळत ठेवायचे अशा पद्धतीचे काम सुरू होते, असे नरेंद्र मोदी म्हणाले. “एक काळ आला होता, जेव्हा लोकांना असं वाटत होतं की, कोणाचंही सरकार आलं तरी आता देशाचं काहीही होणार नाही. पण भाजपाने या धारणेमध्ये बदल घडवला,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
“यंदाचा भाजपा स्थापना दिवस तीन कारणांसाठी महत्त्वाचा ठरतो. पहिलं कारण म्हणजे सध्या आपला देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. दुसरं कारण म्हणजे वेगाने बदलणारी वैश्विक परिस्थिती आणि तिसरं कारण म्हणजे काही आठवड्यांपूर्वीच चार राज्यांमध्ये भाजपाने निवडणुकीत यश मिळवले. तीन दशकांनंतर राज्यसभेत कोणत्या तरी पक्षाच्या सदस्यांची संख्या १०० पर्यंत पोहोचली आहे,” असेही नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा:
‘संजय राऊत, मुख्यमंत्री ठाकरेंना पुरावे द्या; टाईमपास करून वेळ घालवू नका’
भाजपा स्थापना दिन; देशभरातून निघणार शोभायात्रा
आता आयएनएस विक्रांतसाठी संजय राऊतांचा आकांत
भाजपने भ्रष्टाचार आणि भेदभावाच्या राजकारणाशी संघर्ष केला. देशावासियांना या राजकारणाचं नुकसान लक्षात आणून देण्यास भाजप यशस्वी ठरली, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. देशाच्या विकासासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करत आहोत. इतक्या कठीण काळातही भारत ८० कोटी गरीब, वंचितांना मोफत राशन देत आहे. कोणत्याही दबावाशिवाय आणि कोणत्याही भीती शिवाय आज भारत जगासमोर आपल्या हितासाठी ठामपणे उभा आहे. जेव्हा जग परस्परविरोधी भूमिका घेत आहे. तेव्हा भारत हा मानवतेसाठी लढताना दिसत आहे. आमचं सरकार राष्ट्रीय हिताचे काम करत आहे, असे नरेंद्र मोदी म्हणाले.