सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचा निकाल समोर आला आणि भाजपने या निवडणुकीत वर्चस्व प्रस्तापित केले. सिंधुदुर्गातील ही निवडणूक राणे कुटुंबियांसाठी अत्यंत प्रतिष्ठित होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी ३१ डिसेंबर रोजी कोकणात पोहचले. तेव्हा नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.
जनतेच्या आणि देवदेवतांच्या आशीर्वादाने हा विजया मिळाला असल्याचे नारायण राणे म्हणाले. आमदार नितेश राणे आणि कार्यकर्ते यांच्या मेहनतीमुळे हा विजय मिळाला असल्याचेही नारायण राणे म्हणाले. या निवडणुकीनंतर आता पुढील लक्ष्य आहे महाराष्ट्र सरकार. विधानसभेवर आता लक्ष असेल असा इशाराही त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिला आहे. विधानसभा निवडणूक आणि लोकसभेला निवडणूकीमध्ये कोकणात भाजपच निवडून येणार असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
हे ही वाचा:
समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपचे वर्चस्व
श्रीनगरमधील चकमकीत जैश-ए-मोहम्मदचे तीन दहशतवादी ठार
नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर टीकेची तोफ डागली. महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवून दिली, असे नारायण राणे म्हणाले. तीन पक्ष एकत्र आहेत तरीही त्यांचा पराभव झाला. राज्याचे अर्थमंत्री येतात आणि पराभव करून जातात याला अक्कल म्हणतात, असा टोला नारायण राणे यांनी अजित पवारांना लगावला आहे.
राज्याला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. आताचे मुख्यमंत्री गायब आहेत, असा टोलाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. राज्य अधोगतीकडे चालले आहे. १० वर्षे मागे चालले आहे, असेही राणे म्हणाले. नितेश राणे यांचे काही पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले होते त्याविषयी बोलताना नारायण राणे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. राज्य कारभार करायची लायकी नाही फक्त पोस्टर लावायची लायकी आहे, असा घाणाघात त्यांनी केला आहे. बँक निवडणूक जिंकलो तर आता साखर कारखाना विकत घ्यायला बारामतीला कर्ज देणार नाही, असा टोला नारायण राणे यांनी लगावला आहे.