केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी १८ फेब्रुवारी रोजी ट्विट करत मातोश्रीवरील चार जणांना ईडीची नोटीस मिळणार असल्याचे म्हटले होते. तसेच सुशांत सिंग प्रकरणाची चौकशी पुन्हा होईल असे ट्विटमध्ये म्हटले होते. यावेळी नारायण राणे यांनी दिशा सालियन आत्महत्या आणि सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. नारायण राणे यांच्या ट्विटनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शनिवारी १९ फेब्रुवारी रोजी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी भाजप आमदार नितेश राणे उपस्थित होते.
सर्वप्रथम नारायण राणे यांनी शिवजयंती निमित्त शिवाजी महाराजांना अभिवादन केले. तसेच मनात कपट असणाऱ्यांच्या हाती सत्ता ठेवू नका अशी प्रार्थना देखील त्यांनी केली. ८ जूनला दिशा सालियन हिची बलात्कार करून हत्या झाली, पण आत्महत्या झाल्याचे सांगण्यात आले, असा आरोप नारायण राणे यांनी केला. दिशा हिचा पोस्ट मॉर्टेम अहवाल का आला नाही? दिशा सालियन ज्या इमारतीत राहायची त्या इमारतीच्या रजिस्टरची पान कशी फाडली? कोणी हे केलं? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. सात महिन्यात अहवाल यायला हवा. पण डॉक्टरांना आणि इतरांना कोणी दम दिला? असाही प्रश्न त्यांनी विचारला.
अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला या प्रकरणाची माहिती समजली होती. यावरूनच त्याच्या घरात बाचाबाची झाली आणि तेव्हा त्याची हत्या झाली. सुशांतसिंह राजपूत याच्या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज कसे गायब झाले? ठराविक माणसाची रुग्णवाहिका कशी आली? पुरावे कसे नष्ट झाले? याची चौकशी होणार असा दावा नारयण राणेंनी केला. या प्रकरणातील अधिकारी हे सर्व उघड करतील, असेही ते म्हणाले. आपलं ऐकलं नाही की त्यांना ठार मारायचे, असं यांच आहे असा आरोप नारायण राणे यांनी केला आहे.
नारायण राणे यांच्या जुहूच्या ‘आदिश’ या घराला मुंबई महापालिकेकडून नोटीस बजावण्यात आली होती. त्यावरूनही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. १७ सप्टेंबर २००९ रोजी ‘आदिश’ इमारत बांधली. तेव्हा कोणतीही कायदेशीर बाबी अपूर्ण न ठेवता याचे काम पूर्ण केले आहे. मूळ बांधकाम झाल्यावर या जागेत एक इंचाचेही बांधकाम केलेले नाही. आम्ही आठ जण घरात राहतो त्यामुळे नव्या बांधकामाची गरजच पडली नाही.
हे ही वाचा:
शिवनेरीवर बाळ शिवबासाठी पाळणा जोजवला
‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’
स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..
रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती
ही तक्रार देखील मातोश्रीकडून गेली आहे. प्रशासन त्यांच्या हातात आहे. सातत्याने तक्रारी करायच्या हेच काम आहे, असा टोला त्यांनी लगावला. मराठी, मराठी नागरिक असं फक्त करत राहायचे पण शिवसेनाप्रमुखच मराठी माणसाच्या मुळावर आहे. मराठी माणूस हद्दपार होतोय. तरुणांना रोजगार दिला नाहीत. फक्त राजकारण केलं आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही, असा टोला देखील त्यांनी लगावला. मुख्यमंत्री कोणाला भेटत नाहीत. दर्शन देत नाहीत. आजारपणावर मला बोलायचे नाही असे ते म्हणाले पण जर इतर कोणी असते तर राजीनामा दिला असता. फक्त ऑनलाईन बोलायचे, मंत्रालयात जात नाही, मिटिंगला जात नाही. या मुख्यमंत्र्यांची इतिहासात नोंद होईल, असा टोला नारायण राणेंनी लगावला.