दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून राज्यात राजकारण तापले असतानाच केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर शनिवारी ५ मार्च रोजी रात्री उशीरापर्यंत त्यांची मालवणी पोलिसांनी चौकशी केली. त्यानंतर नारायण राणेंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये खळबळजनक दावा केला. या प्रकरणामध्ये नारायण राणे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेतले आहे.
नारायण राणे म्हणाले की, “मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियानच्या आईला तक्रार करण्यासाठी भाग पाडले. तिने आत्महत्या केली नसून, ती हत्या आहे हे आम्ही बोलत होतो. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना त्यांना तक्रार करायला भाग पाडलं,” असा दावा नारायण राणे यांनी केला.
त्यानंतर नारायण राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. दिशा सालियनची ८ जून आणि सुशांत सिंग राजपूतची १३ जूनला हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्र्यांचा दोनदा फोन आला होता. तसेच सुशांत आणि दिशाच्या केसबद्दल बोलू नका, असं सांगण्यात आले. एका मंत्र्याची गाडी होती असे कुठे बोलू नका. मी हे जबाबात सांगूनही हे सर्व जबाबातून वगळले असल्याचा दावा नारायण राणे यानी केला. तसेच ही केस राजकीय हेतून प्रेरित आहे. मुद्दाम आमच्यावर दबाव टाकण्याच प्रयत्न करत आहेत असेही नारायण राणे म्हणाले.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी खास फेटा
चार राज्यात भाजपा सरकार स्थापन करणार
मणिपूरमध्ये नेत्याच्या घरावर बॉम्ब हल्ला
युद्ध थांबवण्यासाठी रशियाने युक्रेनसमोर ठेवल्या या अटी
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी काही दिवसांपूर्वीच नारायण राणेंनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन गौप्यस्फोट केले होते. “दिशा सालियनची बलात्कार करून हत्या केली होती. तिच्या पोस्ट मॉर्टमचा अहवाल अजून बाहेर का आलेला नाही? दिशा सालियन ज्या इमारतीत राहायची, त्या इमारतीच्या रजिस्टरची ८ जूनची पानं का नाहीत? कुणी फाडली?” असे अनेक सवाल नारायण राणेंनी उपस्थित केले होते.
“सुशांत सिंग राजपूत याला जेव्हा हे कळलं, तेव्हा तो बोलला की मी यांना सोडणार नाही. मग काही लोक त्याच्या घरी गेले आणि घरात जाऊन बाचाबाची झाली. त्यानंतर त्याची हत्या झाली. तेव्हा कोणत्या मंत्र्याची गाडी होती? त्या बिल्डिंगचे सीसीटीव्ही गायब कसे झाले?” असेही अनेक प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केले होते.