नारायण राणे यांनी केला हल्लाबोल
ठाकरे सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायची इच्छा नाही. उलट आरक्षण रद्द झाले, याचा त्यांना आनंदच आहे. पोटात एक आणि ओठात एक अशी त्यांची स्थिती आहे, अशा शब्दांत भाजपा नेते नारायण राणे यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारमधील काही मंत्री राज्यपालांना भेटले. त्यासंदर्भात राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारचे वाभाडे काढले.
हे ही वाचा:
डीआरडीओच्या संशोधनामुळे ऑक्सिजन सिलेंडरचा सर्वोत्तम वापर शक्य
‘लॅन्सेट’च्या भारतविरोधी लेखामागे ‘चायनाचा हात’
उद्धव ठाकरे तोंडावर गोड, आतून महाकपटी
राणे यावेळी म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिला त्यानुसार महाराष्ट्राला आरक्षण देता येणार नाही, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. पण आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकार किती आक्रमक होते, त्यांची किती तयारी होती, कोणकोणत्या वकिलांशी बोलले, काय अभ्यास केला. हा प्रस्ताव कोर्टासमोर मांडला, तो काय आहे, याची माहिती सरकारला आहे का? सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण नाकारल्यावर आता मुख्यमंत्री आणि मंत्री राज्यपालांकडे जातात आणि सांगतात की, हा केंद्र आणि राष्ट्रपतींचा अधिकार आहे. आपली जबाबदारी झटकण्याचा हा प्रयत्न आहे. एकूणच आता जे काही आहे ते केंद्रच करेल. आपण फक्त मातोश्रीत बसायचे. राणे म्हणाले की, या मुख्यमंत्र्यांनी राज्यासमोरील कोणते प्रश्न सोडवले? राज्याचे विकासाच्या बाबतीतले कोणते प्रश्न सोडविले. केंद्राकडे बोट दाखविले म्हणजे प्रश्न सुटत नाही. सगळे अशोक चव्हाणच करतील तर मुख्यमंत्री काय करतील? मास्क लावा आणि हात धुवा एवढेच सांगतील का?
राणेंनी सांगितले की, ३९ वर्षे शिवसेनेत राहिलो. मी जवळून पाहिले यांना. यांना मराठा आरक्षण द्यायचे नव्हते. आज ९ राज्यांत ५० टक्क्यांच्या वर आरक्षण आहे. मग महाराष्ट्राला का कमी? प्रस्ताव नाकारला ना मग बोलावून घ्या विरोधी पक्षांना. करा चर्चा. काही तज्ज्ञांशी चर्चा करा. एकदा काय ते ठरवा. खरे तर, मराठा मंत्र्यांना आरक्षणात रस नाही. आपले मंत्रिपद टिकले की झाले. सेक्रेटरीने पत्र लिहिले यांनी ते राज्यपालांकडे जाऊन दिले. बाकी काही नाही. पोस्टात पत्र टाकतात ना तसे. मराठा समाजाने आता एक व्हायला हवे.