युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुखरूप मायदेशी आणण्याचे प्रयत्न सुरू असून मंगळवार, १ मार्च रोजी ‘मिशन गंगा’ अंतर्गत १८२ विद्यार्थी परत आले आहेत. या विद्यार्थ्यांचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल संजय राऊतांनी कधी चांगलं म्हटलं आहे का? असा खोचक सवाल त्यांनी विचारला आहे. लोकांना युक्रेनहून मायदेशात परत आणण्याची ही मोहीम काय शिवसेनेने सुरू केली का? हा माणूस शुद्धीत असतो का? अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. भारत सरकारने चार मंत्र्यांची नेमणूक केलीये, मला इथे पाठवले आहे आणि केंद्र सरकारचे लक्ष नाही आहे असं का म्हणता? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. या माणसाला टीका करण्याखेरीज काही काम नाही, असा घणाघातही नारायण राणे यांनी केला आहे.
‘ऑपरेशन गंगा’ बद्दल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या मोहिमेचे नाव ‘ऑपरेशन गंगा’ ठेवलं आहे, अशी टीका केली होती. तसेच अजून अनेक जण युक्रेनमध्ये अडकून आहेत, अशी टीकाही त्यांनी केली होती. संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांवर नारायण राणे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
हे ही वाचा:
शार्क टँक इंडिया फेम ‘भारत पे’चे सह- संस्थापक अश्नीर ग्रोव्हर पायऊतार
युक्रेनला भारताकडून मदतीचा हात
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आणखी एक साक्षीदार पलटला
महाशिवरात्री पूजेचे महत्त्व; काय असतात विधी?
युक्रेनमध्ये भारतीय अडकले आहेत, त्यांना परत आणण्यासाठी कार्यक्रम दिला आहे. विमान लँड झाल्यानंतर विमानात जाऊन या विद्यार्थ्यांची भेट घेतली. विद्यार्थी भयभीत झाले असून काही मुली घाबरल्या होत्या. त्यांचं स्वागत केलं. त्यांचे मनोबल वाढवले. काही पालकही भेटले आहेत. त्यांच्याशी बोलणे झाले. या विद्यार्थ्यांना आता देशात पोहोचल्याचे समाधान आहे, असे नारायण राणेंनी सांगितले.