शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीनंतर त्यांच्यावर अनेक नेत्यांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे. भारतीय जनता पार्टीचे मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांना सडेतोड उत्तर दिले आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र डागले आहे. भाजपाचे ३०३ खासदार निवडून आले आणि यांचे तीनच राहिलेत. खोबर गेलं करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा, अशी खोचक टीका करत राणे यांनी ठाकरेंना सल्ला दिला आहे.
उद्धव ठाकरेंना मी खूप जवळून ओळखतो. सध्या शिवसेनेत बाळासाहेबांच्या नावानं भावनिक नाटकं चालू आहेत. उद्धव ठाकरे एक नंबरचे खोटारटे, कपटी आणि दुष्टबुद्धीचे आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेच्याबाबतीत निर्माण झालेल्या वादाबाबत बोलत असताना नारायण राणेंनी मोठं विधान केले. ते म्हणाले, नक्षलवाद्यांच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांना मारायची सुपारी दिली होती. माझी मारण्याची सुपारी सुद्धा उद्धव ठाकरेंनी दिली होती. पण ज्यांना त्यांनी सुपाऱ्या दिल्या त्यांनीच मला सांगितलं, असा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे.
पुढे राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर मराठी माणसाची आठवण झाली. मी त्यांना गेल्या ४० वर्षांपासून ओळखत असून त्यांच्यात दृष्टपणा आणि कपटीपणा भरलेला आहे. सत्तेतील अडीत वर्षात ठाकरेंनी कोणतेच काम केलेले नसून, आजरपण आणि मातोश्री या दोन्हीमध्येच त्यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ गेला. अडीच वर्षात उद्धव ठाकरे फक्त तीन तास मंत्रालयात गेले होते. आज सामनामध्ये प्रकाशित झालेली ठाकरेंची मुलाखत ही ठरवलेल्या प्रश्नांवर होती असा आरोपही नारायण राणेंनी केला आहे.
हे ही वाचा:
पराभवानंतर राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचे ‘एकला चालो रे!’
सोनिया गांधींची पुन्हा ईडी चौकशी; आंदोलन करणारे राहुल गांधी पोलिसांच्या ताब्यात
तृणमूलच्या सात खासदारांसह १९ खासदारांवर निलंबनाची कारवाई
नरेंद्र मोदी तुमचे वडील नव्हते, मग त्यांचे फोटो वापरून का निवडणूक लढविली?
आता स्वतःचं पद एकनाथ शिंदे यांना मिळालं याच्यामुळे त्यांना पोटशुळ झाला आहे. आता संजय राऊत मनातून खुश आहेत. माझ्या गुरूंनी, शरद पवारांनी सोपवलेलं काम फत्ते केलं, अशी टीका राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली. तसेच संजय राऊतांना राणे यांनी अप्रत्यक्षपणे जोकर म्हटले आहे. उद्धव ठाकरे आता म्हणतायत माझे वडिल, माझा वारसा आहेत. पण वारसा हा रक्ताने नाही तर विचाराने असतो. साहेबांचे किती विचार आत्मसात केले. साहेबांना जेवढं प्रेम दिलं त्याच्या अधिक पटीने यांनी साहेबांना त्यांनी दु:ख दिलं आहे, त्रास दिला आहे असा गंभीर आरोपही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.