आर्थिक कोंडीत सापडलेल्या परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलले आहे. आता पर्यंत २५ हून अधिक कर्मचाऱ्यांनी आपला प्राण गमावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणेंनी पुन्हा एकदा नाव न घेता परिवहन मंत्री अनिल परबांवर निशाणा साधला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था आहे ते आत्महत्या करतायत, पगार नाही, खरं तर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालू शकते येवढं त्यानं कमवलंय, असे सांगत नारायण राणेंनी अनिल परबांवर टीकास्त्र सोडले आहे.
सिंधुदुर्गात नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ‘एसटी कर्मचारी आत्महत्या करतायत, पगार कित्येक महिने नाही ही एसटी कर्मचाऱ्यांची अवस्था आहे. त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढे त्याने कमावले आहे. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो. तो शिवसेनेचा कलेक्टर आहे, ही उद्याची हेडलाईन आहे’, अशी टीका नारायण राणेंनी नाव न घेता अनिल परबांवर केली आहे.
हे ही वाचा:
पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना ७५० रुपयांची भरगच्च ‘दिवाळी भेट’
उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ
टेनिस सोडून लिएंडर पेस राजकारण खेळणार
अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव आगारामधील परिवहन मंडळाच्या एका चालकाने आगारात उभ्या असलेल्या एसटीच्या मागच्या बाजूस गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) घडली. ऑक्टोबरच्या सुरुवातीलाही बीड आगारातील चालक तुकाराम सानप यांनी राहत्या घरात कर्जाला कंटाळून आत्महत्या केली होती. पंढरपूर आगारातील दशरथ गिड्डे यांनीही आर्थिक समस्यांना कंटाळून आत्महत्या केली होती. कर्मचाऱ्यांचे वेळच्यावेळी न मिळणारे वेतन ही प्रमुख समस्या असून आर्थिक गणित बिघडल्यामुळे कर्मचारी असे टोकाचे पाऊल उचलत आहेत.