केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राजापूर इथे चालू असलेल्या जन आशिर्वाद यात्रेदरम्यान नाणार प्रकल्पाबद्दल सकारात्मकता दाखवली आहे. ‘नाणार आता होणार’ असल्याची घोषणा केंद्रीय मंत्र्यानी केल्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नाणार प्रकल्प समर्थक आणि विरोधक यांच्यामधील असलेल्या मतमतांतरांमुळे रखडलेला आहे, तसेच राजकीय पक्षांमध्येही या विषयासाठी मत भिन्नता आहे.
जन आशिर्वाद यात्रे दरम्यान राजापूर मधील लोकांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला काही लोकांचा विरोध असला तरी हा प्रकल्प होणे गरजेचे आहे. त्यामुळे ‘नाणार आता होणार’ असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे. तसेच लोंकानी नाणारला विरोध न करता प्रकल्पाच्या बाजूने राहण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा:
नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल
अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे
…म्हणून सध्या चवदार तळे आहे चर्चेत
‘कोळी समाजाला हद्दपार करण्याचे शिवसेनेचे कारस्थान’
राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील चौदा गावांमध्ये प्रस्तावित असलेल्या नाणार प्रकल्पाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सागवे येथे झालेल्या सभेच्या वेळी ‘नाणार नाही होणार’ अशी घोषणा केली होती. राजकीय मतभेद आणि राखडपट्टीमुळे गेल्या काही महिन्यांपासून रिफायनरी प्रकल्प नाणार परिसरामध्ये न उभारता बारसू- सोलगाव परिसरात उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. प्रकल्प समर्थकांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन प्रकल्प व्हावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशिर्वाद यात्रे दरम्यान त्यांनी केलेल्या घोषणेमुळे हा प्रकल्प पुन्हा चर्चेत आला आहे.
रिफायनरी समर्थन समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. शशिकांत सुतार, अॅड. यशवंत कावतकर, कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी राणे यांची भेट घेतली. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग आणि कोकणात अनेक रोजगार संधी निर्माण होणार आहेत. सिंधुदुर्गातून उद्योजक बनले तर माझं मंत्रिपद सार्थकी लागेल, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सांगितले.