केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज पत्रकार परिषदेत घेताना शिवसेना खासदार आणि दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर हल्ला चढवला आहे. संजय राऊत पहिल्यांदा राज्यसभा खासदार झाले तेव्हा साधे मतदार यादीत त्यांचे नाव नव्हते असा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे.
शनिवार, २३ एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत कौर राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी घातलेल्या राड्या संदर्भात राणे यांनी पत्रकार परिषद घेत आपले मत व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिवसेना पक्ष, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलेच तोंडसुख घेतले. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
हे ही वाचा:
‘राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’
‘राणांच्या घरावर हल्ला करा, असे आदेश मुख्यमंत्र्यांनीच दिले’
संजय राऊत यांना मी खासदार बनवले पहिल्यांदा ते खासदार झाले. तेव्हा मतदार यादीत त्यांचे मतदार म्हणून नाव देखील नव्हते. बाळासाहेबांनी मला बोलवले आणि याला खासदार करा असे सांगितले. मग मी याला घेऊन गेलो आणि फॉर्म भरला तेव्हा स्क्रुटीनी झाली आणि आक्षेप नोंदवला गेला. त्यावेळी मी सगळे सांभाळून घेतले. त्यामुळे मी साक्षीदार आहे. मी संजय राऊत यांचा सगळ्या कच्छाचिठ्ठा बाहेर काढू शकतो असे राणे यांनी पुन्हा एकदा म्हटले आहे.
हजारो शिवसैनिक मातोश्री आणि राणा दाम्पत्यांच्या इमारतीसमोर जमले असल्याचे शिवसेना नेत्यांनी सांगित होते. मात्र अखंड महाराष्ट्रातून फक्त २३५ शिवसैनिक मातोश्रीवर जमले होते. तर राणांच्या इमारतीजवळ फक्त १२५ शिवसैनिक जमले होते असे राणे यांनी म्हटले आहे.