केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकार विरोधात हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले आहे. तर जन आशीर्वाद यात्रेवर दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या अनुषंगानेही राणेंनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ‘तुमच्या वरती आम्ही आहोत हे लक्षात ठेवा’ असे म्हणत नारायण राणे यांनी महाराष्ट्र सरकारला खडे बोल सुनावले आहेत.
केंद्रीय मंत्री नारायण राणे हे सध्या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मुंबईमध्ये फिरत आहेत. गुरुवार, १९ ऑगस्ट रोजी या यात्रेला सुरुवात झाली असून यात्रेचा पहिला दिवस खूपच गाजला. नारायण राणे यांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेतले. शिवसैनिकांना हे चांगलेच झोंबले असून त्यांनी या स्मृतिस्थळाचे गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले. तर या यात्रेच्या आयोजनासाठी मुंबई पोलिसांकडून सात जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शुक्रवार, २० ऑगस्ट रोजी नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत या सर्व गोष्टींचा समाचार घेतला आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेला मन शुद्ध करण्याचा सल्ला दिला आहे. तर ‘मी कोणा समोर हात जोडायचे, नतमस्तक व्हायचे हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे’ असे राणे यांनी म्हटले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्यांनाही राणे यांनी टोला लगावला आहे. ‘त्या स्मारकाच्या इथे जाताना चिखलातून जावे लागते, बाळासाहेबांचा फोटोही धड दिसत नाही. जर काही करायचं असेल तर ते स्मारक जागतिक दर्जाचे होईल यासाठी प्रयत्न करा. देशातली बाकीची स्मारके बघा. तिथे चांगली उद्याने असतात. फुलांचे सुशोभीकरण केले असते.’ असे म्हणत राणेंनी शिवसैनिकांना चांगलेच खडसावले आहे.
हे ही वाचा:
शिवसैनिकांनी केली ‘या’ नेत्यावर दगडफेक
‘भारतात हिंदू तालिबानी आहेत’ मुनव्वर राणांची मुक्ताफळे
रस्ते, शाळांपेक्षा सायकल ट्रॅक महत्त्वाचा!
तर जन आशीर्वाद यात्रेवर दाखल झालेल्या गुन्ह्यांवरूनही त्यांनी सरकारला झोडपले आहे. ‘असे सात, सत्तर, सात हजार गुन्हे दाखल झाले तरी मी घाबरत नाही. ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्या पाठीशी मी ठामपणे उभा आहे’ असे राणे यांनी सांगितले. तर कोरोना काळात राज्यातील सरकारमधील पक्षांच्या झालेल्या कार्यक्रमांवरही त्यांनी निशाणा साधला. यावेळी बोलताना ‘सूडबुद्धीने गुन्हा दाखल करणाऱ्या सरकारने, तुमच्यावरही कुणीतरी बसले आहे. आम्ही तुमच्यावर आहोत हे लक्षात ठेवावे’ असा इशारा राणे यांनी दिला आहे.
मुंबई महापालिकेत सत्ता परिवर्तन होणे गरजेचे असल्याचे यावेळी त्यांनी पुन्हा एकदा बोलून दाखवले. ‘आम्ही सत्तेत आल्यावर मुंबईची स्पर्धा जागतिक दर्जाच्या इतर शहरांसोबत होईल’ असे नारायण राणे म्हणाले.
तर या पत्रकार परिषदेत राणेंनी पत्रकारांनाही गोड शब्दात समजुतीचे चार शब्द सुनावले. पत्रकार सातस्त्याने विचारत असलेल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळ शुद्धीकरणाच्या प्रश्नावरून राणेंनी पत्रकारांना समज दिली. ‘काल आम्ही एवढे फिरलो, भेटी गाठी केल्या, मी देशभराचे प्रश्न मंत्री म्हणून हाताळत आहे. पण आपण प्रश्न काय विचारताय? तर गोमूत्र, गोमूत्र, गोमूत्र! अहो शिवसैनिकांनी असे का केले हे मला का विचारताय? ज्यांनी केलं त्यांना विचार. तेच सांगू शकतील.’ असे म्हणत नारायण राणे ह्यांनी या प्रश्नाचे उत्तर देऊन त्याला विराम दिला.