केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेमुळे महाराष्ट्रात खळबळ

केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेमुळे महाराष्ट्रात खळबळ

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे गुन्हे दाखल झाल्यानंतर दुपारी भाजपाचे नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली. राणे यांच्या अटकेमुळे महाराष्ट्रातील वातावरण तापले आहे.

नारायण राणेंना ताब्यात घेतल्यानंतर आता कोर्टामध्ये कसं हजर करायचं याचीही कायदेशीर माहिती पोलिसांकडून घेण्यात येत आहे. ही अटक संगमेश्वरमधून करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर राणे हे त्यांच्याच गाडीतून संगमेश्वर पोलिस ठाण्यात गेले. तिथे राणे यांच्या कार्यकर्त्यांनी गाड्या अडविण्याचा प्रयत्न केला. या अटकेपूर्वी राणे यांनी रत्नागिरी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, पण तो फेटाळण्यात आला. शिवाय, मुंबई उच्च न्यायालयातही एफआयआर रद्द करण्यासंदर्भात तातडीची सुनावणी घेण्याची विनंती करण्यात आली, त्यालाही न्यायालयाने त्वरित सुनावणी घेण्यास नकार दिला.

नारायण राणे यांच्यावर रत्नागिरीत कारवाई होईल, रत्नागिरी पोलीस हे राणे यांच्यावर अटकेची कारवाई करतील आणि प्रकरण नाशिक पोलिसांकडे वर्ग करुन नाशिक पोलीस त्यांना कोर्टात हजर करतील, अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त दीपककुमार पांडे यांनी दिली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी नारायण राणेंना त्यांच्यावर लावलेल्या कलमांची आणि गुन्ह्याच्या स्वरुपाची माहिती देण्यात आली. वैद्यकीय तपासणी केली असता नारायण राणेंचा रक्तदाब आणि रक्तातील साखर वाढल्याची माहिती समोर आली. भाजपा नेते प्रमोद जठार यांनी ही माहिती दिली. त्यानंतर जवळपास तासाभराच्या ताणाताणीनंतर रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांच्यावर अटकेची कारवाई केली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी केलेल्या भाषणात स्वातंत्र्यदिनाचा अमृतमहोत्सव की हिरक महोत्सव अशी विचारणा केली होती. त्याचा संदर्भ देत मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केल्यानंतर नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान केंद्रीय कॅबिनेट मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीत पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात राणेंना कोर्टात नेण्यात आले.

हे ही वाचा:

भारत अफगाणिस्तानचा खरा मित्र, पाकिस्तानकडून तालिबानला फूस

मला रत्नागिरीत का जाऊ दिले जात नाही?

राणेंच्या अटकेने काय पडसाद उमटतील, याचा विचार केलाय का?

सायकल ट्रॅकचा घाट कुणाच्या फायद्यासाठी?

राणेंचा जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक आणि पोलीस राणेंच्या निवासस्थानी पोहोचले. त्यानंतर त्यांनी राणेंना काही कागदपत्रं देण्यात आली. यावेळी पोलीस आणि राणेच फक्त खोलीत होते. भाजपाच्या सर्व नेत्यांना आणि राणेंच्या सुरक्षा रक्षकांना खोलीबाहेर ठेवण्यात आलं होतं, अशी प्राथमिक माहिती मिळते.

Exit mobile version