विधानसभा निवडणूक अगदी काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाही महाविकास आघाडीमध्ये अजूनही जागा वाटपावरून अंतर्गत कलह असल्याचे दिसून येत आहे. ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात जागा वाटपावरून आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचे चित्र आहे. विदर्भातील जागांवरून या दोन पक्षांमध्ये जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीकडून उमेदवार जाहीर केले जात असताना दक्षिण सोलापूरमधून ठाकरे गट आणि काँग्रेस अशा दोन्ही पक्षांनी उमेदवार जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे. दक्षिण सोलापूर येथून ठाकरे गटाने अमर पाटील यांना उमेदवारी देऊ केली आहे. परंतु, काँग्रेसने रविवारी जाहीर केलेल्या यादीत दक्षिण सोलापूरमधून दिलीप माने यांच्या नावाची घोषणा केली. यावरून हा वाद चव्हाट्यावर आला आहे. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, “आम्ही सगळे एकत्र लढतो आहोत. सोलापूर दक्षिण या जागेवर शिवसेनेने उमेदवार दिला आहे. काँग्रेसच्या यादीतही काँग्रेसने उमेदवार जाहीर केला. आता मी असं मानतो ही टायपिंग मिस्टेक आहे. पण अशा टायपिंग मिस्टेक आमच्याकडूनही होऊ शकतात.”
यानंतर नाना पटोले यांनीही संजय राऊत यांना खोचक सल्ला दिला आहे. “संजय राऊत यांची नाराजी असणं हे त्यांचं व्यक्तीगत मत आहे. आम्हालाही कोकणात एकही जागा मिळाली नाही. मग आम्ही काय करायचं? कुणाला किती जागा मिळाल्या हा विषय नाही. संजय राऊतांनी हा विषय संपवला पाहिजे. विरोधकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे. मला असं वाटतं की संजय राऊतांनी आपली भूमिका विरोधकांच्या विरोधात मांडली पाहिजे, असा प्रेमाचा सल्ला आहे,” असा खोचक सल्ला नाना पटोले यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
हे ही वाचा:
रशिया- युक्रेनमधील युद्धावर नरेंद्र मोदी तोडगा काढू शकतील
जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या वाहनावर गोळीबार
सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबेल तेव्हाच बंगालमध्ये शांतता नांदेल!
गुप्तांगात लपवून आणले १ किलो वजनी सोने, तपासणी करताच पितळ उघड!
संजय राऊत यांच्या टायपिंग मिस्टेक या वक्तव्यावरही नाना पटोले यांनी संजय राऊतांचा समाचार घेतला आहे. हायकमांडने निर्णय घेतला असून त्यांच्या पातळीवर सोलापूरबाबत चर्चा होईल. राज्य म्हणून आम्ही त्यात प्रतिक्रिया देणार नाही, असं नाना पटोले यांनी सांगितलं.