काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे नियोजित उत्तर महाराष्ट्र दौरा सोडून दिल्लीला रवाना होत आहेत. नाना पटोले यांनी केलेली स्वबळाची भाषा, महाविकास आघाडीतील कुरबुरी या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा आहे. या दौऱ्यात नाना पटोले हे पक्षश्रेष्ठी सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेस नेत्यांची बैठक बोलावली आहे. काँग्रेसचे सरटिणीस, प्रदेशाध्यक्ष आणि राज्य प्रभारी देखील या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारच्या कामकाजाविषयी त्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील महाविकासआघाडी सरकार, काँग्रेसची स्वबळावर लढण्याची घोषणा, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची भूमिका यावर या बैठकीत चर्चा होऊ शकते. काँग्रेसच्या इतर प्रश्नांवर देखील बैठकीत चर्चा होऊ शकते. कोरोना, महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ याबाबत पक्षाची भूमिका यावर देखील चर्चा होऊ शकते.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी जळगाव येथे स्वबळाचा पुनरुच्चार केला आहे.
हे ही वाचा:
मॅकॅफी अँटीव्हायरसचे संस्थापक जॉन मॅकॅफी आढळले मृतावस्थेत
नवी मुंबई विमानतळ, भूमिपुत्रांचे घेराव आंदोलन सुरु
ठाकरे सरकारमध्ये ओबीसी मंत्र्यांचं माकड झालंय
नाना पटोले यांच्या स्वबळाच्या वक्तव्यावरती काँग्रेस पक्षामध्ये देखील नाराज असल्याची बातमी आता समोर येत आहे. पक्षातील काही नेते आणि आमदार नाराज असल्याची माहिती आहे आहे. निवडणुकीला आणखी वेळ असल्यामुळे आत्ताच स्वबळाची भाषा योग्य नसल्याचे मत काही नेते आणि आमदार खाजगीत व्यक्त करत आहेत. दुसरीकडे पटोले यांच्या घोषणेनंतर सेना आणि राष्ट्रवादीत देखील नाराजी आहे. खुद्द मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील नाराज आहेत.