लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक रविवारी होईल. पक्षाच्या दुसऱ्या यादीमध्ये किमान १५० उमेदवारांची घोषणा होऊ शकते. गेल्या दोन दिवसांत राजस्थान, हिमाचल प्रदेश, हरयाणासह आठ राज्यांच्या कोअर ग्रुपसोबत केलेल्या चर्चेत बहुतांश जागांवरील उमेदवारांची नावे निश्चित झाली आहेत. या बैठकीत सर्वांत प्रथम महाराष्ट्र आणि बिहारच्या कोअर ग्रुपची बैठक होईल.
एकेका जागेवर चर्चा करण्यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते बुधवारपासूनच राज्यांच्या कोअर ग्रुपसोबत बैठका घेत आहेत. आतापर्यंत राजस्थान, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, हरयाणा, ओडिशा राज्यांतील कोअर ग्रुपसोबत बैठक झाली आहे. याच क्रमात महाराष्ट्रही आहे.
उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत उत्तर प्रदेशमधील आणखी काही जागा जाहीर केल्या जातील. याशिवाय, उत्तराखंड आणि दिल्लीतील उर्वरित दोन जागा, हिमाचल प्रदेशातील सर्व चार, हरयाणातील आठ जागांवर उमेदवार जाहीर केले जातील. पक्षसूत्रांनी सांगितल्यानुसार, रायबरेलीच्या जागेवरही उमेदवाराची घोषणा केली जाऊ शकते.
हे ही वाचा :
राहुल गांधी यांची वायनाडमधून उमेदवारी जवळपास निश्चित
जागतिक महिला दिनी पंतप्रधान मोदींकडून मोठी भेट; सिलेंडरच्या किंमतीत १०० रुपयांची कपात
मोहम्मद शमी उतरणार निवडणुकीच्या मैदानात?
रोहतकची जागा अभिनेता रणदीप हुड्डाला?
बिहारमधील जागावाटपाचा पेच न सुटल्याने गुरुवारीदेखील प्रस्तावित कोअर ग्रुपची बैठक होऊ शकली नाही. भाजपला बिहारमध्ये किमान १७ जागा हव्या आहेत. तर, जनता दलाला १३ जागा हव्या आहेत. उपेंद्र कुशवाहा गटाला दोन, जीतन राम मांझी यांना एक जागा हवी आहे. लोजपाला पाचपेक्षा अधिक जागा देण्यास भाजप उत्सुक नाही. याशिवाय, भाजप आणि जनता दलामध्ये काही जागांची अदलाबदल होऊ शकते. महाराष्ट्रात शिवसेना शिंदे गटाला १० आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला पाच जागा मिळतील, असे सांगितले जात आहे.