ज्या निकालाची राजकीय वर्तृळात प्रतीक्षा होती, तो निकाल आला आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे चिन्ह दिले आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. लोकप्रतिनिधींच्या संख्येच्या आधारावर आयोगाने हा निकाल दिला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे प्रमुख नेते असतील.
गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना कुणाची यावरून रणकंदन सुरू होते. निवडणूक आयोगात उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गट यांनी सदस्यांची प्रतिज्ञापत्रे सादर केली होती. मात्र दोन्ही गटांकडे किती आमदार आणि खासदार आहेत याच्या आधारावर पक्ष कुणाचे हे निवडणूक आयोगाने ठरविले असावे.
एकनाथ शिंदे आणि ४० आमदार वेगळे झाले. आता ४० आमदार आणि १२ खासदार आपल्यासोबत असल्याचे शिंदे यांनी सिद्ध केले आहे, असे म्हटले जात आहे.
हे ही वाचा:
वेळकाढूपणा हवा म्हणून मोठ्या खंडपीठाची मागणी
राष्ट्रीय स्मारकात स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मार्पणदिनानिमित्त विशेष कार्यक्रम
स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआय निवड समिती अध्यक्षपदावरून चेतन शर्मा पायउतार
गिरीश बापट यांच्यामुळे कसब्याचा गड मजबूत
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासंदर्भात म्हणाले की, एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन. खरी शिवसेना ही विचारांची शिवसेना आहे आणि ती एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या यासंदर्भातील प्रतिक्रिया तयारच असतील. जर त्यांच्या बाजूने निकाल लागला असता तर निवडणूक आयोगाने योग्य काम केले, असे ते म्हणाले असते. आता विरोधात निर्णय आल्यावर निवडणूक आयोग दबावाखाली आहे. पण निवडणूक आयोग संविधानानुसार चालतो.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासंदर्भात म्हणाले की, बाळासाहेबांच्या विचारांशी एकरूप झालेल्या लोकप्रतिनिधी, पदाधिकारी हजारो शिवसैनिकांचा हा विजय आहे. लोकशाहीचा विजय आहे. भारतीय घटनेनुसार कारभार चालतो. या राज्यात जी घटना आहे कायदा आहे, आमचे सरकार आहे. या घटनेवर नियमाने सरकार स्थापन झाले. हा निकाल मेरिटवर दिलेला आहे. मी निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. बहुमताचा विजय आहे. पुन्हा सांगतो की, बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या विचारांचा हा विजय आहे. सत्याचा विजय आहे.
यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, शिंदे गटाकडून हे चिन्ह आणि पक्षाचे नाव आम्हालाच मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात होता, त्यातच सगळे आले.